Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

साखरपुड्यानंतर प्रेमसंबंधातून कट रचल्याचा संशय; पोलिस तपासात अपघात नव्हे तर पूर्वनियोजित हत्या समोर
Lohagad Case
Lohagad CasePudhari
Published on
Updated on

पुणे/ पिंपरी: तो तिच्यासोबत भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. दोघांच्या कुटुंबात नवे नाते निर्माण झाल्याचा आनंद होता. परंतु, तिच्या डोक्यात भलताच विचार सुरू होता. तिला काही करून आपल्या वाटेतून होणाऱ्या नवऱ्याला दूर करायचे होते. चार दिवसांपूर्वी तिने लोहगडावर योजना आखली होती. मात्र, तिचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. अखेर तिला १८ जून रोजी संधी मिळाली. तिने आणि तिच्या प्रियकराने होणाऱ्या नवऱ्याचा लोहगड किल्ल्यावरील दरीत ढकलून खून केला.

Lohagad Case
Maharashtra Agriculture Awards: पुणे जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार; कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान

लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आलेला खून असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमताने केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलून त्याचा खून झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

१८ जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस झुडपांमध्ये केतनचा मृतदेह आढळून आला होता. त्या वेळी सिया गोयल हिने फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचे सांगितले होते. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटना संशयास्पद वाटल्याने पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीतून, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि खुनाचा कट उघड झाला. सियाचा फेब्रुवारी महिन्यात केतनसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, तिला हे लग्न मान्य नव्हते. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. चेतन चौधरीसोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी केतन अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपविण्याचा कट सुमारे आठवडाभरापूर्वी रचला होता.

Lohagad Case
Marathi Balakosh Project: ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘बालकोश’ प्रकल्पाला गती; मराठी ज्ञानसंपदेचा नवा अध्याय

ठरल्याप्रमाणे सिया गोयल हिने १८ जून रोजी केतनला लोहगडावर जाण्यास प्रवृत्त केले. केतनच्या घरचे परवानगी देत नव्हते. मात्र, तिने १९ जून रोजी आपला वाढदिवस असल्याचे सांगून त्यांना तयार केले. दोघे कारने सकाळी साडेआठच्या सुमारास घरून निघाले. पावणे अकराच्या सुमारास ते किल्ल्यावर होते. चेतन अगोदरच किल्ला परिसरात पोहोचून थांबला होता. सिया आणि केतन पुढे गेल्यानंतर चेतन मागून आला आणि संधी साधून केतनला दरीत ढकलले, असा आरोप आहे. त्यानंतर सियाने आरडाओरडा करून अपघाताचा कांगावा केला. तसेच, किल्ल्यावरील सुरक्षारक्षक आणि आपल्या घरी याची माहिती दिली. सियाची आई पूजा गोयल हिने केतनच्या आईला फोन करून केतन किल्ल्यावरून खाली पडल्याचे सांगितले. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या पथकाने केली.

Lohagad Case
Khadakwasla Dam Rainfall: खडकवासला धरणक्षेत्रात मान्सूनचे आगमन; वरसगाव-पानशेतमध्ये दमदार पाऊस

अनुभवी ट्रेकर असल्याने निर्माण झाला संशय

केतन अग्रवाल हा नियमित ट्रेकिंग करणारा आणि डोंगर-दऱ्यांमध्ये फिरण्याचा अनुभव असलेला युवक होता. त्यामुळे साधा तोल जाऊन तो दरीत पडल्याच्या दाव्यावर कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली होती. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि त्यातून हा अपघात नसून, घातपात असल्याचे समोर आले.

‘तो’ वाढदिवसाची तयारी करत होता, तर ‘ती’ खुनाची

सिया आणि केतन हे मे महिन्यात तसेच १४ जून रोजीही लोहगडावर जाऊन आले होते. १९ जून रोजी सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन केतनच्या कुटुंबीयांनी केले होते. मात्र, सियाला ते मान्य नव्हते. तिने १८ जूनलाच लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला आणि केतनला तेथे घेऊन गेली. केतन तिच्या वाढदिवसाची तयारी करत होता. परंतु ही आपल्या प्रियकरासोबत त्याच्या खुनाची तयारी करीत होती.

बाली ट्रिपही रद्द; पासपोर्ट हरवला

केतन आणि सिया यांचे प्री-वेडिंग शूटसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात बाली येथे जाण्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे समोर आले आणि संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. तपासादरम्यान हा पासपोर्ट सियानेच लपवून ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

वाढदिवशी 'भावनिक' पोस्ट; नंतर उघड झाला बनाव

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १९ जून रोजी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सिया गोयल हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. ‘माझा वाढदिवस आहे आणि तू मला सोडून गेलास... मी तुझ्यावर खूप प्रेम केले, पण तू मला का सोडून गेलास?’ अशा आशयाची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली होती. मात्र, पोलिस तपासात केतनच्या हत्येच्या कटात तिचाच सहभाग उघड झाल्यानंतर ही पोस्ट केवळ संशय दूर करण्यासाठी आणि सहानुभूती मिळविण्यासाठी रचलेला बनाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

... तर नाते तोडायचे होते!

लोहगड हत्याकांडातील मयत केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी समाजबांधवांना भावनिक आवाहन केले आहे. ‘जर मुलीला हे लग्न मान्य नव्हते, तर नाते तोडायचे होते. मात्र, आमच्या मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित कुटुंबीयांना वस्तुस्थितीची माहिती असूनही ती आमच्यापासून लपविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Lohagad Case
Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपातीचा फटका; टँकरवर अवलंबून सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले

तिन्ही कुटुंबे व्यावसायिक क्षेत्रातील

अग्रवाल, गोयल आणि चौधरी या तिन्ही कुटुंबांचा व्यावसायिक क्षेत्राशी संबंध आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात सुका मेवा, मसाले आणि इतर व्यापार व्यवसायाशी त्यांचा संबंध असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

चेतन, सियामध्ये सहा महिन्यांत दोन हजार कॉल

दिवाळीच्या एका मेळाव्यात चेतन आणि सिया या दोघांचा परिचय झाला होता. गेल्या सहा महिन्यांत दोघामध्ये तब्बल दोन हजार चार फोन कॉल झाले आहेत, तर ते एकमेकांसोबत २३८ तास फोनवर बोलले आहेत.

स्वतःचा मोबाईल दुकानात अन्‌ नोकराचा मोबाईल ठेवला सोबत

पोलिस तपासात चेतन चौधरी याने घटनेच्या दिवशी स्वतःचे लोकेशन समजू नये यासाठी मोबाईल फोन घरीच ठेवला होता. तसेच ओळख लपविण्यासाठी त्याने हुडी परिधान केली होती आणि त्यावर हेडफोन लावले होते. त्यामुळे या गुन्ह्यासाठी त्याने कोणत्या चित्रपट, वेब सिरीज किंवा पूर्वीच्या गुन्हेगारी घटनेतून प्रेरणा घेतली होती का, याचाही तपास पुणे ग्रामीण पोलिस करीत आहेत. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आपल्या मोबाईलचे इंटरनेट बंद ठेवून तो नोकराचा मोबाईल घेऊन गेला होता.

साप आला म्हणून तिने प्लॅन केला, मात्र...

सिया हिने केतन अग्रवाल याचा १४ जून रोजी किल्ल्यावरील कठड्यावरून ढकलून खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला एकटीला काही ते जमले नाही. केतन किल्ल्यावर असताना गवतातून साप आला म्हणून तिने त्याच्‍या अंगावर पडून त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सिया अंगावर पडताच केतन याने स्वतःला सावरले. त्यामुळे त्या दिवशी सियाचा हेतू सफल झाला नाही. अखेर १८ जून रोजी तिला ती संधी मिळाली आणि आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने केतन याचा कायमचा काटा काढला.

केतनचा मृतदेह पाहूनही सियाच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं...

केतनचा मृतदेह घरी आल्यानंतर होणारी सून सिया हिच्या वागणुकीबद्दल संशय निर्माण झाल्याचा दावा केतनच्या वडिलांनी केला आहे. केतनच्या वडिलांनी सांगितले की, आम्हालाही सुरुवातीला हा अपघातच वाटत होता. लोहगड किल्ल्यावर पाय घसरून आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असंच आम्ही समजत होतो. पण, जेव्हा केतनचा मृतदेह घरी आणण्यात आला, तेव्हा सियाच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या वागण्यात दुःख दिसले नाही. नवरा गेल्यानंतर कोणतीही मुलगी पूर्णपणे खचून जाते, तिच्या डोळ्यात वेदना दिसतात. मात्र, सियाच्या बाबतीत तसं काहीच जाणवलं नाही. तिची ती शांतता आणि अलिप्तपणा आम्हाला खटकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news