Marathi Balakosh Project: ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘बालकोश’ प्रकल्पाला गती; मराठी ज्ञानसंपदेचा नवा अध्याय

राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून तज्ज्ञ समिती स्थापन; पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार
Balakosh
BalakoshPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे: तब्बल साडेचार दशकांपूर्वी मांडलेल्या राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या बालकोश या संकल्पनेला अखेर चालना मिळणार आहे. तज्ज्ञ समितीच्या स्थापनेनंतर येत्या सहा महिन्यांत बालकोश निर्मितीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मराठीतील बालवाचकांसाठी ज्ञानाचा समृद्ध खजिना उभारणारा हा प्रकल्प तब्बल ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आकाराला येणार असल्याने शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Balakosh
Khadakwasla Dam Rainfall: खडकवासला धरणक्षेत्रात मान्सूनचे आगमन; वरसगाव-पानशेतमध्ये दमदार पाऊस

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी बालकोशाची संकल्पना ८० च्या दशकाच्या आसपास मांडली होती. कुमार विश्वकोशाचीही कल्पना त्यांचीच होती. मंडळाच्या प्रत्येक अध्यक्षाच्या कारकीर्दीत हा विषय चर्चेत येत राहिला. पण, गेल्या ४५ वर्षांत बालकोशाचा विषय फक्त चर्चेत राहिल्याने त्याचे पुढे काहीच झाले नाही. पण, अखेर चार दशकांनंतर बालकोशाच्या निर्मितीच्या प्रकल्पाला गती मिळणार असून, त्याबाबतच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. तज्ज्ञांची समिती स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिली.

Balakosh
Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपातीचा फटका; टँकरवर अवलंबून सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले

लहान मुलांची आकलन क्षमता, वयोगटानुसार भाषेची पातळी, विषयांची मांडणी आणि ज्ञानसंपदेची उपयुक्तता लक्षात घेऊन हा कोश तयार केला जाणार आहे. विशेषतः दुसरी ते आठवीतील (वय वर्षे आठ ते चौदा) विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची आखणी केली जात आहे. येत्या काही दिवसांत स्थापन होणाऱ्या तज्ज्ञ समितीत बालसाहित्यिक, लेखक, बालरोगतज्ज्ञ, बालचित्रपट निर्माते - दिग्दर्शक, बालमहोत्सव संयोजक, तसेच शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असणार आहे. समितीच्या चर्चेनंतर बालकोशाची रूपरेषा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर तज्ज्ञांची मते आणि सूचना विचारात घेऊन अंतिम आराखडा तयार केला जाईल.

Balakosh
Balbharti Class 6 Maths Book: बालभारतीच्या सहावीच्या गणित पुस्तकात मोठा बदल; तर्कशक्तीवर भर

डॉ. शोभणे यांनी सांगितले, की कुमार कोशाच्या धर्तीवर लहान मुलांसाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक बालकोश तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. या कोशामध्ये विज्ञान, इतिहास, संस्कृती, साहित्य, पर्यावरण, समाजजीवन अशा विविध विषयांवरील माहिती मुलांना समजेल, अशा सोप्या आणि आकर्षक भाषेत दिली जाणार आहे. तसेच बालकांच्या जिज्ञासेला चालना देणारी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणारी मांडणी करण्यावर भर राहणार आहे. बालकोश हा केवळ माहितीचा संग्रह नसून, मराठीतील दर्जेदार ज्ञानसंपदेचा आधुनिक संदर्भग्रंथ ठरणार आहे.

Balakosh
Pune University QS Ranking: पुणे विद्यापीठाच्या QS रँकिंगमध्ये मोठी घसरण; ७९१–८०० गटात फेकले गेले

बालकांना त्यांच्या वयोगटाला अनुरूप, सोप्या आणि ज्ञानवर्धक भाषेत विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण, साहित्य, विज्ञान, इतिहास आणि संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेऊन बालकोश तयार केला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळेल आणि मराठी भाषेत दर्जेदार ज्ञानसंपदा उपलब्ध होईल.

डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news