पुणे: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि आगामी काळात पुरेसा पाऊस पडण्याबाबत अनिश्चितता कायम असल्याने राज्य शासनाने १० टक्के पाणीकपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनाच्या या आदेशानुसार महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपलब्ध जलसाठा आगामी काळासाठी पुरवून वापरता यावा, यासाठी येत्या गुरुवारपासून (दि. १५) दर आठवड्याला एक दिवस संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी केले आहे. त्याचबरोबर बांधकामे, जलतरण तलाव, वाहनांची धुलाई आणि अन्य कामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, अनधिकृत नळजोडण्या आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन त्याचा वापर गरजेनुसार आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. जलसंपदा विभागानेही उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीवापराचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पावसाची अनिश्चितता आणि भविष्यातील शहरातील पाण्याची गरज लक्षात घेता धरणातील पाण्याचा वापर नियंत्रित करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारपासून दर आठवड्याला गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उपलब्ध जलसाठ्याचा वापर मर्यादित ठेवून आगामी काळातील पाण्याची गरज भागविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी घरगुती वापराच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरताच वापर करावा, पाणीगळती तातडीने थांबवावी आणि विनाकारण पाणी साठवून ठेवणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध साठ्याचाही प्रशासनाकडून विचार केला जात आहे. सध्या धरणसाखळीत २६.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उपलब्ध साठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी पाणीबचतीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर महापालिका भर देत आहे.
बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरू नका!
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी एसटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन धुणे, अंगण आणि पदपथ स्वच्छ करणे, यासाठीही पिण्याचे पाणी वापरू नये. सार्वजनिक व खासगी जलतरण तलाव तसेच उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंट, वसतिगृहांनाही सूचना
पाणीबचतीसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी व महाविद्यालयीन वसतिगृहांच्या व्यवस्थापनाने सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अंघोळ, भांडी आणि कपडे धुण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी. घरगुती तसेच संस्थात्मक पातळीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
अनधिकृत नळजोडण्या आढळल्यास गुन्हे दाखल होणार
पाणीपुरवठा व्यवस्थेत अनधिकृत नळजोडण्या आढळल्यास किंवा त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची गळती, फुटलेल्या जलवाहिन्या किंवा पाण्याचा अपव्यय आढळल्यास नागरिकांनी तातडीने महापालिकेला कळवावे.
वर्षाला ०.३१ टीएमसी पाण्याची बचत!
पुणे महापालिकेच्या नियोजनानुसार, दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्याने दिवसाला १८० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. महिन्याला चार दिवसांच्या कपातीनुसार ७२० दशलक्ष लिटर, तर वर्षभरात ८.६४ अब्ज लिटर म्हणजेच सुमारे ०.३१ टीएमसी पाण्याची बचत केली जाणार आहे. महापालिका सध्या आठवड्याला १६५० एमएलडी पाणी धरणातून उचलते.