

बारामती: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा कल स्पष्ट होवू लागला आहे. निंबूत-खंडाळा या गट क्रमांक १ मध्ये पवार यांच्या नेतृत्वाताली श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. अन्य गटातील कलही याच पॅनेलच्या बाजूने झुकत असून मोठ्या फरकाने हा पॅनेल विजयी होईल असे चित्र दिसून येत आहे.
सोमेश्वरसाठी रविवारी (दि. ११) सुमारे ८३.३७ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी माळेगाव येथील अजिंठा कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. ब वर्ग प्रवर्गातून पवार यांच्या नेतृत्वातील पॅनेलचे उमेदवार संग्राम तानाजी सोरटे यांनी ९३ मते घेत मोठा विजय संपादन केला.
कारखान्याचे विद्ममान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलचे महेश राणे यांना ३६ तर प्रकाश किसनराव जगताप यांना एक मत मिळाले. त्यानंतर गटनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. गट क्रमांक एकमध्ये पवार यांच्या नेतृत्वातील पॅनेलने सुमारे पाच हजार मतांची आघाडी घेतली. अन्य गटातही याच पद्धतीने कल दिसून येत आहे. गट क्रमांक एकची मतमोजणी तीन वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी सोमवारी (दि. १२) माळेगाव येथील अजिंठा बॅक्वेट हाॅल येथे सुरु झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाताली श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी ब वर्ग गटातून विजय मिळविला.
सोरटे यांना या प्रवर्गातून ९३ मते मिळाली. लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर पॅनेलचे नेतृत्व या निवडणूकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केले होते. त्यांच्या गटाकडून महेश राणे या निवडणूकीत ब वर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवत होते. परंतु या गटात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील उमेदवार संग्राम सोरटे यांनी एकतर्फी विजय मिळविला. सोमेश्वरच्या निवडणूकीसाठी सुमारे ८४ टक्के मतदान झाले आहे.