Liquor Pudhari
पुणे

Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी गावठी दारू विक्रीचा पर्दाफाश; वारजे माळवाडीत २०० लिटर दारूसह तिघांवर गुन्हा

नवसागर व घातक रसायनांचा वापर करून तयार केलेली दारू जप्त; महिलेसह तिघांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वारजे माळवाडी परिसरात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी विषारी गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

नवसागरसह अन्य विषारी रसायने मिसळून तयार केलेली दारू विक्रीसाठी आणल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकिता रणधीर बिरे (वय ३५, रा. वारजे माळवाडी), छाया कचरावत आणि ऋतिक कचरावत (दोघेही रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई अमोल सुतकर यांनी फिर्याद दिली आहे. शिवशक्ती चौक, विठ्ठलनगर येथील महादेव मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत मंगळवारी रात्री कारवाई केली.

तपासात आरोपी बिरे हिने दारू स्वतःजवळ बाळगली, तर इतर दोघांनी तिला मदत केली. आरोपींनी सुमारे २०० लिटर गावठी हातभट्टी दारू विकत आणून विविध ठिकाणी लपवून ठेवली होती. त्यानंतर ही दारू थोड्या-थोड्या प्रमाणात ओळखीच्या ग्राहकांना विकली जात असल्याचे उघड झाले. या दारूमध्ये नवसागर आणि इतर घातक रसायनांचा वापर करण्यात आल्याने ती मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विषारी दारूमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागातील २२हून अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर पुन्हा अशाप्रकारची विषारी दारू छुप्या पद्धतीने विकली जात असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असूनही आरोपींकडून हा अवैध व्यवसाय सुरू होता. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT