PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: प्रभाग २७ समस्यांनी ग्रस्त; नवी पेठ–पर्वतीत विकास ‘जैसे थे’

आंबिल ओढा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा आणि अतिक्रमणाच्या तक्रारी कायम; राजकीय अनास्थेचा नागरिकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

राजकीय अनास्थेचा बळी पडलेल्या नवी पेठ-पर्वती प्रभागात (क्र. 27) आजही अनेक समस्या आहेत. आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे अर्धवट काम, लोकमान्यनगर, म्हाडा पुनर्वसन, मनपा वसाहतीतील कामगारांची घरे मालकीहक्काने देणे, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, कमी दाबाने येणारे पाणी आदी समस्या कायम आहेत. गेल्या टर्ममध्ये प्रभागात भाजपचे चार नगरसेवक होते. मात्र, तरही समस्या ‌ ‘जैसे थे‌’ असल्याचे नागरिकांनी सागितले.राजकीय अनास्थेचा बळी पडलेल्या नवी पेठ-पर्वती प्रभागात (क्र. 27) आजही अनेक समस्या आहेत.

प्रभाग क्रमांक सत्तावीस सध्या रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचे माहेरघर झाल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ड्रेनेज आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्यांची तर नागरिकांनी सवय करून घेतली आहे. विविध विकासकामांसाठी कोट्यवधींच्या निविदा काढल्या जातात आहेत. मात्र, नागरिकांचे प्रश्न आणि समस्या‌ ’जैसे थे‌’ आहेत.
राकेश क्षीरसागर, रहिवासी

आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे अर्धवट काम, लोकमान्यनगर, म्हाडा पुनर्वसन, मनपा वसाहतीतील कामगारांची घरे मालकीहक्काने देणे, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, कमी दाबाने येणारे पाणी आदी समस्या कायम आहेत. गेल्या टर्ममध्ये प्रभागात भाजपचे चार प्रभागातील काही भाग कसबा विधानसभा मतदार संघ, तर काही भाग पर्वती विधानसभा मतदार संघात आहे. नवीन प्रभागरचनेत या प्रभागात दत्तवाडीच्या काही भागाचा नव्याने समावेश केला आहे. बाकी बहुतांश भाग पूर्वीसारखाच आहे. गेल्या काळात म्हाडा वसाहातीतील रहिवासी, तसेच साने गुरुजीनगर आणि राजेंद्रनगर मनपा वसाहतीतील चतुर्थ श्रेणी कामगारांना त्यांच्या घरांचा मालकीहक्क देण्यासाठी काहीच राजकीय प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. बाबूराव सणस मैदान, नेहरू स्टेडियम ही मैदाने याच प्रभागात आहेत. परंतु गेल्या काळात या मैदानांच्या देखभाल, दुरुस्तीशिवाय ठोस असे काहीच झाले नाही. सारसबाग, पेशवे ऊर्जा उद्यान, लोकमान्यनगर जॉगिंग ट्रॅक आणि छत्रपती शिवाजी उद्यानदेखील या प्रभागात आहे. मात्र, वर्षांनुवर्षे या उद्यानांची परिस्थितीही ‌‘जैसे थे‌’ आहे.

प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, महापालिकेच्या शाळेची दुरवस्था, पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनियमितत पाणीपुरवठा आदी समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रभागाचा विकास खुंटला आहे.
मदन कोठुळे, रहिवासी

या प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे मैदाने, उद्यानांचे सुशोभीकरण करून खेळाडू व नागरिकांना या ठिकाणी आत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या प्रभागात तीन मोठ्या व्यायामशाळा असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीजचोरी झाल्याचे समोर आले होते. त्याचा दंड आणि विजचे पैसे महापालिकेने भरले. त्यानंतर काही दिवस या व्यायामशाळा बंद होत्या. परंतु आता काही ठराविक लोकांकडे या व्यायामशाळांची जबाबदारी दिली आहे. रहिवाशांनी पदपथावर वाचनालयासाठी जागा दिली होती. परंतु आता हेच वाचनालय भाजपचे निवडणूक कार्यालय झाले आहे. तसेच प्रभागात विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचेदेखील नागरिक सांगत आहेत.

प्रभागातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी, ड्रेनेज लाइन, कचरा, आरोग्य सेवा आदी सुविधांकडे माजी नगरसेवक आणि प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. प्रभागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून, ही चिंतेची बाब आहे.
दीपक वाघमारे, रहिवासी

मनपा कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न कायम

महापालिकेचे चतुर्थ श्रेणीतील अनेक कर्मचारी साने गुरुजीनगर आणि राजेंद्रनगर वसाहतीत राहतात. मात्र, त्यांच्या घरांच्या मालकीहक्काचा प्रश्न अद्याप कायम आहे. या वसाहतींची सध्या बिकट अवस्था झाली असून, नागरिक आता मालकीहक्काच्या घरांसाठी आस लावून बसले आहेत. गेल्या अनेक वर्षे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी हा प्रश्न सोडविला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मी माझ्या कार्यकाळात प्रभागात अनेक विकासकामे केली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज असल्याने अनेक कामे रखडलेली आहेत. प्रभागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सणस मैदानाच्या कॉर्नरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सरस्वती शेंडगे, माजी उपमहापौर

प्रभागातील प्रमुख समस्या

  • आंबिल ओढ्याच्या खोलीकरणाचे काम अर्धवट

  • मुख्या आणि अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी

  • खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था

  • अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

  • ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने दुर्गंधी

  • महापालिकेच्या शाळेकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष

  • रस्ते, पदपथांवरील दिवसेंदिवस वाढणारी अतिक्रमणे

  • भष्टाचारात अडकलेल्या व्यायामशाळा

  • पदपथावरील वाचनालयात भाजप निवडणूक कार्यालय

मी महापालिका प्रशासनाला प्रभागातील विविध विकासकामे मी सुचविली आहेत. मात्र, प्रशासनाने ती पूर्ण केली नाहीत. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीसह प्रभागातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
स्मिता वस्ते, माजी नगरसेविका

प्रभागात झालेली प्रमुख कामे

  • आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीची उभारणी

  • रस्तादुरुस्तीच्या कामाला सुरुवात

  • चौकाचौकांच्या सुशोभीकरणावर भर

  • नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू

प्रभागात सध्या अनेक ठिकाणी कचरा आणि राडारोड्याचे ढीग लागल्याचे दिसून येत आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेचा प्रश्नदेखील गंभीर झाला असून, या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शैलेश लडकत, (माजी नगरसेवक कै. महेश लडकत यांचे बंधू)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT