पांडुरंग सांडभोर
पुणे: राज्यात व्होटचोरीच्या आरोपांचे वादळ उठले असतानाच आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या मतदार यादी विभाजनातही व्होटचोरी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षातील मातब्बरांनी त्यांच्या प्रभागांमध्ये शेजारील प्रभागांच्या हद्दीवरील अनुकूल मते आपल्याकडे लावून घेण्याचे, तर अनुकूल नसलेली मते अन्य प्रभागांमध्ये ढकलण्याचे काम केले असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे आता प्रभागरचनेतील हस्तक्षेपानंतर मतदार यादी विभाजनातील हस्तक्षेपाचा मुद्दाही कळीचा ठरण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे 41 प्रभाग अंतिम झाले आहेत. येत्या दि. 11 ऑक्टोबरला या प्रभागांमधील आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार महापालिकेची 36 लाख मतदारसंख्या 41 प्रभागांच्या रचनेनुसार विभाजन करून त्यांच्या मतदार याद्या निश्चित करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उपायुक्त रवी पवार व निखिल मोरे यांची 41 पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक केली असून, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचाऱयांमार्फत प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.
मात्र, या मतदार यादी विभाजन कार्यक्रमातही राजकीय घुसखोरी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रामुख्याने सत्ताधारी पक्षातील इच्छुकांनी त्यांच्या प्रभागांमधील मतदार यादी निश्चित करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांना अनुकूल नसलेल्या मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये लावण्याचे उद्योग केले असल्याचे सांगण्यात आले. तर ज्या ठिकाणी अनुकूल मतदारवर्ग आहे. मात्र, तो प्रभागाच्या हद्दीनुसार अन्य प्रभाग आहे अशा प्रामुख्याने प्रभागाच्या हद्दीवरील मतदारांच्या याद्या स्वत:च्या प्रभागात लावून घेतल्या असल्याचेही सांगण्यात आले.
महापालिकेच्या निवडणूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा पद्धतीचे प्रकार घडले असल्याच्या तक्रारी आल्या असल्याची कबुली दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. तसेच याबाबत संबंधितांना सूचना देऊन दुरुस्ती करण्यास सांगितले असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी महायुतीवर प्रभागरचना अनुकूल करून घेतल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर आता थेट व्होटचोरी करून मतदारही अनुकूल करण्याचा नवीन फंडा यानिमित्ताने समोर आला आहे.
नक्की कशी होतेय व्होटचोरी?
पुणे महापालिकेचे एकूण 41 प्रभाग आहेत. उदा. प्रभाग क्र. 22 मध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराला या प्रभागाच्या हद्दीवर जे मतदान स्वत:ला अथवा त्याच्या पक्षाला होणार नाही अशी खात्री आहे, असे मतदार अथवा मतदार यादीच लगतच्या प्रभागात म्हणजेच प्रभाग क्र. 21 ला जोडण्याचे काम केले जात आहे. त्यात संपूर्ण सोसायटी अथवा एखाद्या संपूर्ण इमारतीमधील मतदान अन्य प्रभागांमध्ये वळविण्याचे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रामुख्याने काही ठिकाणी मुस्लिमबहुल मतदारवर्ग असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीची व्होटचोरी झाल्याच्या तक्रारी आहेत.
मतदार याद्या विभाजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यात प्रभागांच्या हद्दीवरील मतदान नजर चुकीने अन्य प्रभागांत गेले आहे का? याची तपासणी केली जात आहे. तसे प्रकार निदर्शनास आल्यास त्याची दुरुस्ती केली जात आहे. येत्या दि. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होईल. त्यावर दि. 12 नोव्हेंबरपर्यंत हरकती-सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यात यासंबंधीच्या आलेल्या तक्रारी आणि हरकतींवर कार्यवाही होईल.रवी पवार, उपायुक्त, पुणे मनपा