

पुणे: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (एमआयडीएच) आणि राज्य सरकारच्या कृषी समृद्धी योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टलवर सामूहिक शेततळ्यांसाठी 13 हजार 304 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये छाननीअंती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार 9 हजार 12 अर्जधारकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळी उभारल्यास राज्यात नव्याने सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. सामूहिक शेततळ्यांसाठी 75 टक्के आणि जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी मंडळ तथा एनएचएमचे संचालक अशोक किरनल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. एमआयडीएच अंतर्गत सामूहिक शेततळे योजना राबविण्यात येते. योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइनद्वारे संबंधित कागदपत्रे दिलेल्या मुदतीत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 1 हजार 268 शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अपलोड केलेली आहेत.
उर्वरित शिल्लक अर्जांच्या छाननीनंतर त्यांचीही योजनेत निवड अपेक्षित आहे. सामूहिक शेततळी उभारण्यास मंजूर केलेली संख्या पुढीलप्रमाणे : छत्रपती संभाजीनगर 1890, जालना 1822, अहिल्यानगर 1587, बीड 758, सोलापूर 450, बुलडाणा 258, धुळे 257, धाराशीव 415, हिंगोली 105, लातूर 220, नांदेड 168, पुणे 247, सांगली 241, वाशिम 121, सातारा 43, कोल्हापूर 26, नाशिक 93, परभणी 61.
एमआयडीएचअंतर्गत सामूहिक शेततळ्यांसाठी 16 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर आहे. त्यामध्ये केंद्र 60 टक्के व राज्य सरकारचा 40 टक्के वाटा आहे. त्यातून 850 शेततळ्यांसाठी अनुदान दिले जाणे अपेक्षित आहे. शिवाय कृषी समृद्धी योजनेतूनही निधी मिळणार आहे. ज्याद्वारे फळबागा आणि भाजीपाला पिकांना संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होऊन पिकांच्या उत्पादनाची शाश्वती राहते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सामूहिक शेततळ्यांकडे वाढत आहे.
दत्तात्रय काळभोर, कृषी उप संचालक, एमआयडीएच, पुणे.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठीही अनुदान
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी 75 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यासाठी सद्यःस्थितीत 79 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील आज अखेर 40 हजार 656 अर्जधारकांची निवड झालेली आहे. तर अस्तरीकरणाचे (प्लास्टिक आच्छांदन) काम पूर्ण झालेली संख्या 2 हजार 329 इतकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेही पावसाने ताण दिल्यास पिकांच्या आवश्यकतेवेळी संरक्षित सिंचनातून पाण्याची गरज भागवून पिकांची उत्पादकता वाढविण्यास फायदा होतो.