

पुणे: शहरातील विविध भागांमध्ये सध्या महाप्रीत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांमुळे पुन्हा एकदा रस्त्यांची खोदाई सुरू आहे. या कामांमुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. नागरिकांना खड्डे, धूळ आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून समन्वय, सुरक्षितता आणि दर्जेदार पुनर्डांबरीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (Latest Pune News)
शहरात महाप्रीत आणि सीसीटीव्ही या दोन स्वतंत्र योजनांसाठी एकूण 500 किलोमीटर रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. यापैकी सुमारे 125 किलोमीटर परिसरात दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच भागात होत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास होत आहे. महापालिकेच्या बैठकीत ही कामे एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात सीसीटीव्ही प्रकल्पाचे ठेकेदार आधी खोदकाम करतात आणि नंतर महाप्रीत कंपनी पुन्हा त्याच ठिकाणी खोदाई करते, असे घाटे यांनी नमूद केले.
पालिकेने ‘रस्त्यांना कमीत कमी छेद घेऊन खोदकाम करावे’ अशा सूचना दिल्या असूनही मोठ्या आकाराचे खड्डे घेतले जात आहेत. खडी टाकून रस्ते अपूर्ण ठेवले जातात, त्यामुळे वाहन घसरून अपघात वाढत आहेत, असे घाटे यांनी निदर्शनास आणले. शिवदर्शन चौक, ई-लर्निंग स्कूलसमोर आणि इतर भागांत ही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठेकेदारांवर कारवाईची मागणी
घाटे यांनी ठेकेदारांकडून पुनर्डांबरीकरण नीट करण्याची, योग्य बॅरिकेडिंग व सूचना फलक लावण्याची हमी घेण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी आयुक्तांना सुचविले.
जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा आग्रह
पुण्यात जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्त्यांवर मिलिंगचे काम सुरू आहे. मात्र, त्यानंतर तातडीने डांबरीकरण होत नसल्याने वाहने घसरून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे मिलिंगनंतर 24 ते 48 तासांत पुनर्डांबरीकरण करणे बंधनकारक करावे, अशी मागणी घाटे यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय आवश्यक
दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सुरक्षा निकषांचे पालन, चेतावणी फलक लावणे आणि रस्त्यांचे पुनर्निर्माण वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि शहराच्या सौंदर्याच्या दृष्टीने पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशी विनंती घाटे यांनी आपल्या पत्रात केली आहे.