

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारी निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयार सुरू केली असून भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या हेतुने आवश्यक त्या नियोजनाबाबत प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या विविध विभागांची पूर्व नियोजन बैठक आळंदी नगरपरिषद टाऊन हॉल इमारतीत पार पडली. यात प्रांताधिकारी दौंडे यांनी नियोजनाबाबत सूचना करत कार्तिकी वारीच्या अनुषंगाने तातडीची कामे युद्ध पातळीवर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. (Latest Pune News)
या बैठकीस मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले-पाटील, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खेडचे उपकार्यकारी अभियंता, महावितरण चाकणचे कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग खेड, आगारप्रमुख राजगुरुनगर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, पीएमपीएमएलचे आगार व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता महावितरण आळंदी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून दि. 12 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी सर्व संबंधित विभागांना आपल्या विभागाशी निगडित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भोसले-पाटील यांनी दर्शनबारी, मंडप, आरोग्य, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही, स्काय वॉकखालील खड्डे बुजविणे आणि कचरा व्यवस्थापन याबाबत सूचना केल्या.
महावितरण विभागाने विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याचे व जुन्या तारांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खड्डे बुजविण्याचे, तर पाटबंधारे विभागाने नदीत 150 क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्याचे सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने दर्शनबारी, सीसीटीव्ही, मंडप, वॉच टॉवर, अतिक्रमण निर्मूलन इत्यादी सर्व कामे 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.
भाविकांसाठी जिल्हा परिषदेमार्फत 1 हजार 800 व नगरपरिषदेमार्फत 1 हजार मोबाईल टॉयलेट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरात सुरळीत पाणीपुरवठा, 5 फिलिंग पॉइंट्स, एनडीआरएफची दोन पथके, अग्निशमन वाहने, भोजन व्यवस्था आणि अतिरिक्त विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रथोत्सवाच्या काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा ठेवण्यात येईल.
पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीने यावर्षी 15 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय राखून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस विभागाकडून 150 अधिकारी व 1 हजार 100 अंमलदार, तसेच 600 अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याचे सांगण्यात आले. दर्शनबारी परिसरात मंडप, वॉच टॉवर, माईक सिस्टीम, पीए सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली.