Green Peas Pudhari
पुणे

Pune Peas Price: मटारची आवक दुप्पट; पुण्यात दरात घसरण

हिमाचलमधून वाढलेली आवक; आले, काकडी व घेवड्याचे दर वाढले

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: पोषक वातावरणामुळे हिमाचल प्रदेश येथील हिरव्या, टपोऱ्या दाण्यांच्या मटारच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात मटारची आवक दुपटीने वाढली आहे. रविवारी बाजारात सात ते आठ टेम्पोंमधून मटार विक्रीसाठी दाखल झाला. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने त्याच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण होऊन दहा किलोला 400 ते 650 रुपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात 180 ते 200 रुपये किलो दराने विक्री सुरू होती.

बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहिली. उन्हाच्या तडाख्यासह उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने आले, काकडी आणि घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, भुईमुंग शेंग कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी 2 टेम्पो, गाजर इंदौर 5 ते 6 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 टेम्पो, हिमाचल येथून मटार 7 ते 8 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 12 ते 14 टेम्पो तर इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 6 ते 7 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, शेवगा 3 ते 4 टेम्पो, कांदा सुमारे 80 ते 90 टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथी स्वस्त

उन्हाच्या झळांनी पालेभाज्यांच्या उत्पादनावर सावट आणले असले तरी बाजारात कोथिंबीर आणि मेथीने मात्र दिलासा दिला आहे. मागणी बेताची राहिल्याने या दोन्ही भाज्यांच्या दरात गड्डीमागे सुमारे दोन ते तीन रुपयांनी घसरण झाली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. रविवारी बाजारात कोथिंबीर सुमारे 90 हजार जुड्यांनी, तर मेथी 50 हजार जुड्यांनी दाखल झाली. आवक जवळपास कायम राहिल्याने उर्वरित सर्व पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर राहिले असून बाजारात संतुलित चित्र पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT