

पुणे: फळांचा राजा असलेल्या आंब्याची बाजारात आवक वाढून दर आवाक्यात आल्याने बाजारात आंब्याला मोठी मागणी आहे. नागरिकांनी आंब्याच्या खरेदीकडे आपला मोर्चा वळविल्याने बाजारात अन्य फळांच्या मागणीत घट झाली आहे. कलिंगड, खरबूज आणि पेरू वगळता बहुतांश फळांची आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहे.
उन्हाचा चटका कायम असल्याने कलिंगड, खरबूज, द्राक्षे आदी रसदार फळांकडे कल कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड आणि खरबूजाच्या भावात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, कलिंगड पेरूलाही चांगली मागणी असून त्याच्याही भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारात उन्हाळी बहरातील डाळींब बाजारात दाखल होत आहे. यामध्ये, पांढरे तसेच गुलाबी दाण्यांच्या डाळींबाची आवक जास्त आहे. या फळांना मागणी टिकून असल्याने त्यांचे दरही स्थिर आहेत.
गुलटेकडी येथील मार्केटयार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 3) फळबाजारात मोसंबीची 20 ते 25 टन, संत्रा 1 ते 2 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 5 ते 6 टेम्पो, लिंबाची सुमारे 1000 ते 1500 गोणी, किंलगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 7 ते 8 टेम्पो, चिक्कू 2 हजार गोणी, पेरु 100 ते 150 क्रेट, अननस 6 ट्रक आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 300 ते 2000, मोसंबी : (3 डझन) : 240-450, (4 डझन) : 100-240, संत्रा : (10 किलो) : 300-900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-160, आरक्ता : 10-40, गणेश : 5-30, किंलगड : 12- 25, खरबूज : 12-25, पपई : 12-20, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 400 - 1000, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (कच्चा) : 1200-3500, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (तयार) : 2000 ते 3500. कर्नाटक : हापूस (3 ते 5 डझन) 1000-1500, पायरी (4 डझन) 600-1000, लालबाग (1 किलो) 30-40, बदाम (1 किलो) 30-40.