पुणे: उरुळी देवाची येथील आंदोलनामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे हा कचरा कुजल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाची यंत्रणाच विस्कळीत झाली आहे. शहरातील तब्बल ३ ते ४ हजार टन कचरा पडून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उरुळी देवाची येथील महापालिकेच्या ओपन डंपिंगसह अन्य कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या समस्यांबाबत उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांकडून कचरा डेपोच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी शहरातून दररोज उचलला जाणारा कचरा पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. शहरात दररोज २८०० टन कचरा निर्माण होतो. यामध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील कचऱ्याचाही समावेश आहे. या कचऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कचरा उरुळी देवाची येथील प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो. मात्र, या ठिकाणी दररोज जाणारा ५०० ते ६०० टन कचरा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रकल्पावर पाठवता आलेला नाही. त्यामुळे शहरातील उपलब्ध जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा साठवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
कचरा साठवण्याची जागाही संपली
उरुळी देवाची येथे कचरा पाठवण्यास अडथळा निर्माण झाल्यानंतर महापालिकेने हस्तांतरण केंद्रे आणि कचरा वाहने यांचा वापर करून तात्पुरती साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनांची आणि उपलब्ध जागांची क्षमता संपल्याने आता अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला कचरा साचत आहे. दररोज नव्याने निर्माण होणारा कचरा त्यात भर पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
आंदोलनाचा फटका संपूर्ण शहराला
उरुळी देवाची येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रश्न केवळ त्या परिसरापुरता मर्यादित राहिलेला नाही. आंदोलनामुळे कचरा प्रक्रिया व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याबरोबरच पर्यायी कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट व्यवस्थेची क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेने विविध प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी, सध्याच्या परिस्थितीत शहरात पडून असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरले आहे. अनेक भागांत कचरा साचलेला असून, लवकरच तो उचलला जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
वाहनांचीही क्षमता संपली
कचरा उचलण्यासाठी महापालिकेची वाहने आणि हस्तांतरण केंद्रांचा वापर करून काही प्रमाणात कचरा साठवून ठेवण्यात आला आहे. मात्र, या वाहनांची तसेच उपलब्ध साठवणुकीच्या जागांची क्षमताही आता संपत आली आहे. त्यामुळे कचरा रस्त्यांच्या कडेला आणि विविध ठिकाणी साठून राहू लागला आहे. दररोज नव्याने निर्माण होणाऱ्या कचऱ्याची भर त्यात पडत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. पावसामुळे साचलेला कचरा ओला होऊन कुजण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी अनेक भागांत दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३ ते ४ हजार टन कचरा पडून
शहरात दररोज सुमारे २८०० टन कचरा निर्माण होतो. नव्याने समाविष्ट गावांमधील कचराही त्यात समाविष्ट आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात कचरा उरुळी देवाची येथील प्रक्रिया प्रकल्पात जातो. मात्र, दररोजचा सुमारे ५०० ते ६०० टन कचरा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तेथे पाठविता आलेला नाही. त्यामुळे शहरात सुमारे ३ ते ४ हजार टन कचरा साचला आहे. उपलब्ध २७ प्रक्रिया प्रकल्पांची क्षमताही पूर्णपणे वापरात नसल्याने अतिरिक्त कचऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
आमच्या सोसायटी परिसरातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला गेलेला नाही. सोसायटीचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. आम्ही तक्रारी करूनही कुठलीच कारवाई होत नाही.आकाश पाटील, अध्यक्ष, एस थ्री प्राइम सोसायटी
उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असल्याने कचरा पाठवण्यात अडचणी येत आहेत. या प्रश्नावर चर्चा सुरू असून, आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर इतर कचरा प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. शहरातील साचलेला कचरा लवकरात लवकर उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.संतोष वारुळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त