Mahatma Phule Poetry Competition: ‘महात्मा फुले विचार आणि कार्य’ विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा; कविता पाठवण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर

किमान २० पानांची कविता आवश्यक; ३० सप्टेंबर २०२६पर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन
Mahatma Phule Poetry Competition
Mahatma Phule Poetry CompetitionPudhari
Published on
Updated on

पुणे: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मदिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्याला काव्यरूपातून अभिवादन करण्यासाठी राष्ट्र सेवा दल, पुणे आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दीर्घ काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य’ हा या स्पर्धेचा विषय असून, इच्छुक कवींनी आपली कविता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्र सेवा दलाच्या दिवाळी अंकाचे संपादक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कवी अजय कांडर यांनी हे आवाहन केले आहे.

या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १ हजार रुपये असतील. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या कविता राष्ट्र सेवा दलाच्या २०२६च्या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येणार आहेत. कविता अतिशय दीर्घ असल्यास तिचा काही भाग प्रसिद्ध केला जाईल.

किमान २० पानांची कविता आवश्यक

स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी कविता किमान २० पानांची असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा मोठी कविता पाठवण्यासही परवानगी आहे. पंधरा ते वीस ओळींचे लेखन एक पान आणि छंदोबद्ध कविता असल्यास पाच कडव्यांचे लेखन एक पान, असे गृहीत धरले जाणार आहे.

कविता वाचण्यास सुलभ अशा अक्षरात लिहिलेली किंवा टाईप केलेली असावी. प्रत्येक पानाच्या एकाच बाजूला लेखन असावे. कविता एका प्रतीत पोस्ट किंवा कुरियरने पाठवायची आहे.

कवितेसोबतच्या टपालावर कवीचा मोबाईल क्रमांक स्पष्ट आणि वाचता येईल अशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे.

कविता पाठवण्याचा पत्ता

बुद्धभूषण रवींद्र बगाडे

द्वारा – राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, सिंहगड रोड, पर्वती, पुणे – ४११०३०

महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण, स्त्री-मुक्ती आणि वंचितांच्या हक्कांसाठीच्या कार्याला काव्यातून मांडण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून कवींना मिळणार आहे. त्यामुळे दीर्घ कविता लिहिणाऱ्या कवी आणि साहित्यिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news