

पुणे: राज्य मंत्रिमंडळाने कृषी विभागाच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी दिल्यामुळे कृषी विभागाच्या पूर्वीच्या पाच संचालकांसह आता नव्याने कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व ॲग्रिस्टॅक हे सहावे संचालकपद निर्माण केले आहे. राज्यात कार्यरत उपविभागीय कृषी अधिकारी यांची (एसडीओ) ९० कार्यालये व मंडळ कृषी अधिकारी यांच्या ८८५ कार्यालयांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आल्याचे समजते.
या कार्यालयातील पदांना आता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत समायोजित केल्याने प्रशासकीय कामकाजास व योजनांच्या अंमलबजावणीस बळकटी मिळण्याची अपेक्षा असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून समजले. आकृतिबंधावरील शिक्कामोर्तब करताना सुरुवातीपासूनच अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. कृषी आयुक्तालयातंर्गत कार्यरत प्रशासन सहसंचालक कार्यालय आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही, असे सांगत तोंडावर बोट ठेवत.
प्रशासन विभागाकडून जे काही होईल ते मंत्रालय स्तरावरूनच होईल, अशी भूमिका घेत राहिल्याने कृषी विभाग कर्मचाऱ्यांच्या संघटनांपासून हा विषय चार हात लांब कसा राहील, याला वरिष्ठांनी प्राधान्य दिल्याची उघड चर्चा सुरू आहे. त्यामुळे या आकृतिबंधावरील निघणाऱ्या शासन आदेशानंतरच याबाबतचे नेमके चित्र व संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. कृषी आयुक्तालयातंर्गत संचालक कार्यालयांची पूर्वीप्रमाणे असणाऱ्या रचनेतील नामबदल व कार्ये पाहता हे पाच संचालक कायम आहेत.
त्यामध्ये संचालक कृषीविस्तार व प्रशिक्षण, कृषी फलोत्पादन व काढणी पश्चात व्यवस्थापन (राष्ट्रीय फलोद्यान अभियानासह), कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक (पूर्वीप्रमाणे कायम), कृषी प्रक्रिया व नियोजनाऐवजी आता कृषी संचालक धोरण, नियोजन व संनियत्रण, कृषी मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनऐवजी आता कृषी संचालक हवामान अनुकूल व शाश्वत शेती संचालनालयाची स्थापना केली असून, हे पाचवे कृषी संचालक राहतील. याठिकाणी ३५ पदांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
नव्याने निर्माण केलेल्या सहाव्या कृषी संचालकांमध्ये कृषी अभियांत्रिकी (यांत्रिकीकरणासह), मालमत्ता, व्यवस्थापन व ॲग्रिस्टॅकचा समावेश असलेल्या नवीन कृषी संचालनालयास मान्यता देऊन ६३ पदांना मंजुरी देण्यात आल्याचे समजते. सध्या प्रतिनियुक्तीवर संचालक दर्जाचे कृषी विभागाचे चार अधिकारी कार्यरत आहेत. त्यामध्ये अकोला येथील बीज प्रमाणीकरण यंत्रणा संचालक, नागपूरचे वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण तथा वनामती, पुण्यात कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतील संचालक असे कृषी विभागातून तेथे कार्यरत चार संचालकांची प्रतिनियुक्तीवरील पदे कायम राहतील, असे सध्याचे चित्र असल्याचे सांगण्यात आले.