SPPU Pudhari
पुणे

Pune University Professor Recruitment: पुणे विद्यापीठ प्राध्यापक भरतीत एटीआर भरण्यास मुदतवाढ

111 पदांसाठी उमेदवारांना दिलासा; 5 मेपर्यंत ऑनलाइन सुधारणा, 9 मेपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 111 जागांच्या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्जात शैक्षणिक, संशोधन, अध्यापन (एटीआर) तपशील न भरलेल्या उमेदवारांना विद्यापीठाने आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना एटीआर भरण्यासाठी 5 मेपर्यंत संधी दिली असून, यामुळे उमेदवारांना त्यांची अपात्रता टाळता येणार आहे. तशा प्रकारचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी एटीआर तपशील भरला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, संबंधित उमेदवार भरती प्रक्रियेत अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन एटीआर न भरलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

मात्र, वाढीव मुदतीमध्ये उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण 111 शिक्षकीय पदांच्या भरतीकरिता जाहिरात 13 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिद्ध केली होती.

तसेच, त्याबाबत वेळोवेळी शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले होते. या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी शैक्षणिक संशोधन तपशील (यापूर्वीचा एटीआर 60 गुण) आणि लागू असल्यास किमान 120/ 75 गुणांचा रिसर्च स्कोअर (एपीआय) संबंधित आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी याची पूर्तता केली नसल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एटीआर 9 मेपर्यंत जमा करावा लागणार

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या अर्जामध्ये 5 मेपर्यंत बदल करावेत. अर्जात बदल, सुधारणा केलेल्या उमेदवारांनी अर्जाची सुधारित प्रत, एटीआर, संबंधित आवश्यक त्या कागदपत्रांसह विद्यापीठ कार्यालयातील प्रशासन शिक्षक कक्षाकडे 9 मेपर्यंत सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT