पुणे: शिक्षणाच्या ज्योतीने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेली व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज उजळून टाकण्यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळमळीने आयुष्य वेचले.
त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी या समाजाची शैक्षणिक सद्यः स्थिती नेमकी काय आहे, याचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात महात्मा जोतिरावांच्या पुण्यतिथी निमित्त येत्या २७ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता फुले वाड्याच्या प्रांगणात होणार आहे.
पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात लोहियानगर आणि येरवडा येथील वस्तींची निवड करण्यात आली आहे. या प्रभागांतील नगरसेवक अविनाश साळवे व मृणाल कांबळे यांचे विशेष सहकार्य या उपक्रमासाठी लाभले असून, इतर स्थानिक नगरसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.
महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी आपल्या विविधांगी कार्यामध्ये मागास समाजाच्या उन्नतीवर सर्वाधिक भर दिला. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा या दोन्ही महापुरुषांचा संदेश होता; तसेच शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. या समाजातील किती विद्यार्थी- विद्यार्थिनींना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे आणि त्यांच्यापुढे नेमके कोणते प्रश्न आहेत, याचा उलगडा करण्यासाठी पुण्यातील किमान दहा भागांत हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
त्यासाठी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांची मदत घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारित एक सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये या समस्यांवरील उपायही सुचवले जातील. या माध्यमातून शिक्षणातील गळती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही डॉ. काळकर यांनी नमूद केले.