Pune Garbage Fine Rules: पुण्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेचा दंडुका; पाचव्यांदा नियमभंग केल्यास दुकान सील!

अस्वच्छतेसाठी १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड; फेरीवाल्यांचा परवानाही होणार रद्द, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्यांची आता खैर नाही. दुकानाच्या परिसरात, खासगी मोकळ्या भूखंडावर किंवा फेरीवाला झोनमध्ये कचरा आढळल्यास संबंधितांना १० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान थेट सील केले जाणार असून, फेरीवाल्यांचा व्यवसाय परवानाही रद्द केला जाणार आहे. स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा पवित्रा पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला असून, उपायुक्त संतोष वारुळे यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Pune Municipal Corporation
Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये बिबट्याचा महिलांवर हल्ला; भात कापणी करताना एकीचा मृत्यू, दुसरी जखमी

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाईची नियमावली जाहीर केली आहे. केंद्र शासनाचे घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. खासगी मोकळ्या जागांवर कचरा आढळल्यास संबंधित मालकाला क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस बजावली जाणार आहे. जागा स्वच्छ करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाईल. या कालावधीत कचरा हटविण्यासह जागेभोवती नवीन पत्र्याचे कंपाउंड उभारून ती बंदिस्त करणे बंधनकारक असेल. मुदतीत कार्यवाही न झाल्यास महापालिका स्वतः साफसफाई करून त्याचा खर्च दंड म्हणून मालकाकडून वसूल करणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करात समाविष्ट केली जाईल. कारवाईच्या पारदर्शकतेसाठी स्वच्छतेपूर्वी आणि नंतरची जिओ-टॅग छायाचित्रेही जतन केली जाणार आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Rooftop Solar Projects: पुणे जिल्ह्यात सौरऊर्जेचा झपाटा; ९५ हजारांहून अधिक ग्राहकांनी उभारले रूफटॉप प्रकल्प

नियमभंग केल्यास आकारला जाईल दंड

  • पहिल्यांदा - १० हजार रुपये

  • दुसऱ्यांदा - २० हजार रुपये

  • तिसऱ्यांदा - ५० हजार रुपये

  • चौथ्यांदा - १ लाख रुपये

  • पाचव्यांदा - दुकान सील; फेरीवाल्याचा परवाना रद्द

मोकळ्या जागांसाठी स्वतंत्र नियम

नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत कचरा हटवून पत्र्याचे कंपाउंड उभारणे बंधन कारक; अन्यथा महापालिका स्वच्छतेचा खर्च दंड म्हणून वसूल करणार.

दुकानांसमोर कचरा टाकल्यास एक दिवसाची मुदत

दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांसमोरील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मालक किंवा भाडेकरूंची असेल. अस्वच्छता आढळल्यास नोटीस देऊन एक दिवसाची मुदत दिली जाईल. फेरीवाल्यांनाही परिसर स्वच्छ ठेवण्यासह ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी दोन कचराकुंड्या ठेवणे बंधनकारक आहे. नियमांचे पाचवेळा उल्लंघन झाल्यास दुकान किंवा आस्थापना सील केली जाईल, तर फेरीवाल्याचा परवाना रद्द केला जाईल. उपायुक्त संतोष वारुळे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

Pune Municipal Corporation
Pune BDP Reservation: पुण्यातील बीडीपी आरक्षणाबाबत मोठी शिफारस; ७० टक्के जागेवर उद्यान, उर्वरित ३० टक्क्यांवर मर्यादित बांधकामाचा पर्याय

कचरा साचल्यास अधिकारी राहणार जबाबदार

शहरातील रस्ते आणि मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग दिसल्यास आता केवळ सफाई कर्मचारी किंवा कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून अधिकाऱ्यांना हात झटकता येणार नाही. क्रॉनिक स्पॉटवरील कचरा, उद्यानांमधील पालापाचोळा, बांधकामाचा राडारोडा आणि जुन्या फर्निचरची वेळेत उचल झाली नाही, तर संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनाच त्यासाठी जबाबदार धरले जाणार आहे. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट तयार झाले असून, वारंवार कचरा उचलूनही त्याच ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढीग साचत आहेत. उद्यानांमधील गार्डन वेस्ट, बांधकामांचा राडारोडा, जुने फर्निचर आणि अन्य टाकाऊ साहित्याची वेळेत विल्हेवाट लावली जात नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या कामात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Municipal Corporation
Pune Traders Protest: पुण्यात अतिक्रमण कारवाईवरून व्यापारी आक्रमक; तोडगा न निघाल्यास शहर बंदचा इशारा

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार क्रॉनिक स्पॉटची नियमित स्वच्छता आणि गार्डन वेस्ट, राडारोडा, तसेच फर्निचर वेस्टची वेळेत उचल करण्याची शंभर टक्के जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्याची जबाबदारी संबंधित झोनमधील कंत्राटदारांकडेच राहणार आहे.

शहरातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून दुकानदार, व्यावसायिक, फेरीवाले आणि खासगी जागामालकांचीही आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

संतोष वारुळे, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.