पुणे: वाहतूक पोलिसांनी बुलेट राजाला चांगलाच दणका दिला आहे. बुलेटला मॉडीफाईड सायलेन्सर लावून फटाके फोडत परिसरात कर्णकर्कश आवाज पसरवणाऱ्या तब्बल 900 सायलेन्सवर रोडरोलर फिरवला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 2 हजार 822 वाहनांवर कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या 900 मॉडीफाय सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोडरोलर फिरवून ते निकामी केले आहेत.
अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. शहर परिसरात विशेषतः तरुण वर्गामध्ये बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच ध्वनिप्रदूषणातही मोठी वाढ होते. त्याची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी शहरात व्यापक मोहीम हाती घेतली. या मोहिमेत एकूण 2 हजार 822 वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी 900 मॉडीफाय सायलेन्सर पोलिसांनी घटनास्थळीच जप्त केले. या धडक कारवाईतून आतापर्यंत 28 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ यांसह प्रमुख भागांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे. जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत, यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यावर रोडरोलर चालवून त्यांचे तुकडे करण्यात आले. शहरात यापुढेही ही मोहीम अधिक तीवतेने सुरू राहणार असून, बेशिस्त चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आता ‘त्या’ गॅरेजचालकावर थेट गुन्हे
वाहनधारकांना मॉडीफाय सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेज चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे यावेळी वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
...कारवाई दृष्टिक्षेपात
एकूण कारवाई केलेली वाहने : 2,822
जप्त केलेले सायलेन्सर : 900
वसूल केलेला दंड :
28 लाख 17 हजार रुपये