

चाकण: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले आहे. या युद्धामुळे आखाती देशातील निर्यात थांबल्याने कांद्याचे भाव कमालीचे गडगडले असून, शेतकरी अडचणीत आला आहे. बुधवारी (दि. 4) चाकण मार्केटमध्ये तब्बल 13 हजार पिशव्या कांद्याची आवक होऊन किलोला सरासरी अवघा 10 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याचे दर आणखी घसरू लागले आहेत. चाकणमधून कांद्याची निर्यात सर्वाधिक आखाती देशांमध्ये होते. मात्र, युद्धामुळे निर्माण झालेल्या त्या भागातील तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर होऊ लागला आहे. दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद झाल्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात थांबली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले 150हून अधिक कंटेनर अडकले असल्याचे कांद्याच्या निर्यातदार कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.
लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकल्याने तो खराब होण्याची भीती शेतकरी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत. दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ असून, विशेषतः महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे पाठविला जातो. मात्र, जहाज वाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारांवर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यात दुबईतील व्यापारी पुढे येत नाहीत. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही आर्थकि गणित विस्कळीत झाले आहे. चाकणसारख्या कांद्याच्या मोठ्या मार्केटमध्ये उत्तम प्रतीच्या कांद्याला सरासरी अवघा 10 रुपये किलो असा दर घाऊक बाजारात मिळत आहे.
त्याचा उत्पादक खर्चाशी मेळ घातला जाऊ शकत नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या झळा आता जाणवायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या युद्धाच्या झळा पोहचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चाकण मार्केटमध्ये येणारे बडे निर्यातदार कंपन्यांचे प्रतिनिधी सांगतात की, युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमधील मार्केट पूर्णपणे बंद आहे. त्याचा परिणाम म्हणजे कांद्यासह सर्वच उत्पादनांची निर्यात ठप्प झाली आहे. कांदा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात स्थानिक बाजारात कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
शेतकऱ्यांवर पुन्हा शिमगा करण्याची वेळ...
दुबईतील जेबेल अली हे मध्य पूर्वेतील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक असून, जगातील सर्वाधिक कंटेनरची वाहतूक या बंदरातून होते. येथून शेतीमालाची आयात आणि आखाती देशांमध्ये पुढील पुरवठा केला जातो. मागील चार दिवसांपासून बंदर परिसरातील कामकाज थांबवण्यात आल्याने सुमारे 200 हून अधिक कंटेनर उतरविण्यात आलेले नाहीत. परिणामी, मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थात जेएनपीटी बंदरावर नाशिक आणि महाराष्ट्रातील 300 हून अधिक कृषिमालाने भरलेले कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत. दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची शक्यता असल्याचे निर्यातदार कंपन्याचे प्रतिनिधी सांगत आहेत. दरम्यान, कांदा निर्यात थांबल्याने देशांतर्गत कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे. केंद्राचे कांदा निर्यातीचे धोरण नेहमीच धरसोडीचे राहिलेले आहे. त्यातच निर्यातीसाठी सज्ज हा कांदा कंटेनरमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा शिमगा करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.