Sugarcane Pudhari
पुणे

Pune Sugarcane Crushing: पुणे जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांचे ३४.६२ लाख टन ऊस गाळप; सोमेश्वरचा साखर उतारा सर्वाधिक

२०२६-२७ च्या हंगामात आतापर्यंत ३२.२० लाख क्विंटल साखर उत्पादन; बारामती ॲग्रो गाळपात आघाडीवर, दोन कारखान्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: साखर आयुक्तालयास यंदाच्या २०२६-२७ च्या हंगामात पुणे जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ३४ लाख ६२ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर, निव्वळ ९.३ टक्के उताऱ्यानुसार एकूण ३२ लाख २० हजार १२४ क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे.

जिल्ह्यातील ८ सहकारी आणि ५ खासगी मिळून १३ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उतारा सर्वाधिक म्हणजे ११.०४ टक्के मिळाला आहे. तर, सर्वात कमी ८.२५ टक्के उतारा दौंड शुगरचा आणि ८.३७ टक्के उतारा बारामती ॲग्रो या खासगी कारखान्याचा आहे.

ऊस गाळपात खासगी कारखाने सध्या आघाडीवर आहेत. त्यामध्ये बारामती ॲग्रोने सर्वाधिक ५ लाख ९० हजार २८८ मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून, ४ लाख ९४ हजार २४७ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दौंड शुगरने ५ लाख २५ हजार २८० मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून, ४ लाख ३३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. श्री साईप्रिया-भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने ३ लाख १८ हजार ४१३ टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. ९.७९ टक्के निव्वळ उताऱ्यानुसार ३ लाख ११ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

श्री सोमेश्वर सहकारीने २ लाख ९० हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून, ३ लाख २० हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दि माळेगाव सहकारीने २ लाख ६७ हजार २२५ टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. १०.१० टक्के निव्वळ उताऱ्यानुसार एकूण २ लाख ६९ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. श्री छत्रपती सहकारीने २ लाख ६९ हजार ९०७, तर विघ्नहर सहकारीने २ लाख ५७ हजार ८० टन ऊस गाळप पूर्ण केल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि अनुराज शुगर्स या कारखान्यांकडून साखर आयुक्तालयास दैनंदिन ऊस गाळप अहवाल अद्याप दिलेला नाही. प्रत्यक्षात एकूण १५ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या गाळपाची आकडेवारी अद्याप एकूण गाळपात समाविष्ट झालेली नाही. ती समाविष्ट झाल्यानंतर प्रत्यक्ष ऊस गाळपाचा आकडा आणखी वाढेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT