

निमोणे: शिरूर-श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळूची चोरी करणाऱ्या वाळूमाफियांच्या ८ यांत्रिक बोटी व नऊ फायबर बोटी जिलेटिनच्या स्फोटात उडवून देण्यात आल्या. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने ही कारवाई केली.
दोन्ही तालुक्यांतील महसूल पथकाने स्वयंचलित बोटीच्या साहाय्याने सोमवारी (दि. 16) सकाळी दहाच्या दरम्यान घोड धरणात प्रवेश केला. कारवाईची चाहूल लागल्यानंतर चिंचणी-गुणाट गावच्या हद्दीत वाळूचोरांनी यांत्रिक बोटी लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने पाठलाग करून सर्व बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडवून दिल्या.
या कारवाईत निमोण्याचे मंडल अधिकारी नंदकुमार खरात, ग्राम महसूल अधिकारी रुपेश शेटे, हर्षद साबळे, नितीन थोरात, श्रीकांत आढाव, कपिल बोडरे, जयकुमार कुसेकर, हनुमंत सोनवणे, बाळासाहेब बुलाखे तसेच श्रीगोंदा महसूल पथकातील मंडल अधिकारी राजेंद्र ढगे, ग्राम महसूल अधिकारी विनोद जाधव, चेतन वाडेकर, समीर पठाण यांनी सहभाग घेतला. या कारवाईत वाळूचोरांची अंदाजे दीड कोटीची यंत्रसामग्री उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.