

पुणे: शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर असताना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून मात्र कारवाईत मोठी उदासीनता दिसून येत आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाने १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत शहरातील ७८ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत. यामध्ये नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक २२ होर्डिंगवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या १५ पैकी तब्बल सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालेली नाही. तर काही क्षेत्रीय कार्यालयांनी केवळ एक ते पाच होर्डिंगवर कारवाई करून नाममात्र कामगिरी केली आहे.
महापालिका हद्दीत होर्डिंग उभारण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाची सशुल्क परवानगी घेणे बंधनकारक आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियम व निकषांची पूर्तता करणाऱ्या होर्डिंगलाच महापालिकेकडून अधिकृत क्रमांक दिला जातो. अशा होर्डिंगवर क्रमांकासह संबंधित जाहिरात एजन्सीचे नाव असलेला पिवळ्या रंगाचा नामफलक लावणे आवश्यक असते. तसेच, होर्डिंगच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणेही बंधनकारक आहे.
मात्र, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग उभारले जातात. अशा होर्डिंगमुळे नियमांचे उल्लंघन होण्याबरोबरच शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेकडून संबंधित होर्डिंगवर कारवाई करून ते जमीनदोस्त केले जातात.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने केवळ एका, औंध-बाणेरने तीन, तर कोंढवा-उंड्री आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांनी प्रत्येकी पाच होर्डिंगवर कारवाई केली आहे. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयांनी अनधिकृत होर्डिंगविरोधात प्रभावी कारवाई केली असताना सात कार्यालयांची कामगिरी मात्र शून्य राहिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, होर्डिंगबरोबरच शहरातील अनधिकृत जाहिरात साहित्यावरही महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये १५ हजार ४६४ बॅनर, ५ हजार ८५३ पोस्टर, ३ हजार ३२३ विविध झेंडे, ३ हजार २८४ किऑक्स आणि १९२ फ्लेक्स हटविण्यात आले आहेत.
...या क्षेत्रीय कार्यालयांना अभय!
आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या आकडेवारीनुसार, सात महिन्यांत शहरातील ७८ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने २२ होर्डिंग हटवून कारवाईत आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे शिवाजीनगर-घोले रोड, कोथरूड-बावधन, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, विश्रामबाग-वाडा आणि कसबा-भवानी पेठ या सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालेली नाही.