Pune Sarasbaug Case Pudhari
पुणे

Pune Sarasbaug Case: सारसबागेत कारमध्ये आढळला पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ!

दादावाडी जैन मंदिराबाहेर उभ्या कारमध्ये आढळला मृतदेह; शुभ्रत बनसोडेच्या मृत्यूचे गूढ कायम, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सारसबाग परिसरातील दादावाडी जैन मंदिराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास आढळून आला. शुभ्रत बाळासाहेब बनसोडे (वय २५, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे त्याचे नाव असून, मागील पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शुभ्रतचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी, स्वारगेट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रथमदर्शी त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला हे समजू शकेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभ्रत बनसोडे हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजता वडिलाचा जेवणाचा डबा घेऊन जातो म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. त्याचे वडील रिक्षा चालवतात. त्यांना डब्बा दिल्यानंतर तो घरी जातो असे सांगून गेला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने एका मित्राला हडपसर परिसरात भेटायला बोलवले. तो त्याला भेटला.

त्यानंतर काही वेळाने त्याचा फोन बंद झाला. सर्व नातेवाइकांनी परिसरात शुभ्रतचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. त्यानंतर २८ ऑक्टोबरला रात्री हडपसर पोलिस ठाण्यात त्याचा भाऊ शुभमने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी सकाळी ९ वाजता एकाने दादावाडी जैन मंदिरासमोरील रस्त्यावर एका कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वारगेट पोलिसासह गुन्हे शाखेची पथके तेथे दाखल झाली. कारच्या मागील सीटवर एक जण बसलेला दिसत होता. पोलिसांनी दरवाजा उघडताच त्याचा मृतदेह दरवाजातून खाली आला.

या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी चौकशी केल्यावर ती कार अविनाश परशुराम गायकवाड याची असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने शुभ्रत बनसोडे हा त्याची गाडी घेऊन गेला होता. हडपसरमधून तो ही गाडी घेऊन कोठे गेला होता. त्यानंतर सारसबागेसमोर त्याने ही गाडी कधी लावली. त्याच्यासोबत कोण कोण होते, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता, सोमवारी रात्री उशिरा त्याची गाडी या परिसरात आल्याची दिसून येते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT