पत्रकार परिषेदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, पोलिस अधिकारी कर्मचारी. Pudhari
पुणे

Pune Rural Armed Robbery Case: एक कोटीच्या सशस्त्र दरोड्याचा थरारक छडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोराची नदीत उडी

४८ तासांत पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडेखोर जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे : खडकवासला-पानशेत रस्त्यावरील खानापूरमध्ये भरदिवसा सराफा पेढीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात पुणे ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघड केला.

दरोडेखोरांनी सराफी पेढीतून 84 तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा तब्बल एक कोटी पाच हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला होता. दरम्यान, पोलिस पाठलाग करत असल्याची चाहूल लागताच एका दरोडेखोराने नदीत उडी घेतली अन्‌ दोघांनी दुसरीकडे पळ काढला. मात्र, प्रसंगावधान राखत धाडसी पोलिसांनी नदीत उडी घेऊन त्या दरोडेखोराला पकडले.

अंकुश दगडू कचरे (वय २०), गणेश भांबु कचरे (वय २३, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत, तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल‍ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात (दि. २६ डिसेंबर) खानापूरमधील वैष्णवी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी कोयते, तलवार हातात घेऊन भरदुपारी दरोडा टाकला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलिसांची एकूण ६ पथके तयार केली होती. यादरम्यान, सीसीटीव्ही व तांत्रिक तपासात एका ठिकाणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. यात त्यांची ओळख निष्पन्न झाली. अधिक तपास दरोडेखोर दोन दुचाकीवरून वेल्हे तालुक्यात गेल्याचे समोर आले. त्यानुसार दोन रात्र आरोपींचा शोध घेत असताना एका दुचाकीवरून तिघे जाताना दिसले. पोलिस दिसताच त्यांनी डोंगरात गाडी घातली. पोलिसांचे पथकही त्यांचे मागे गेले. एक ते दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर मात्र समोर नदी आली. तेव्हा तिघांनी गाडी सोडून पळ काढला.

काही अंतर पाठलागाचा थरार सुरू झाल्यानंतर अंकुश कचरे या दरोडेखोराने नदीत उडी मारली. तेव्हा पोलिस अंमलदार गणेश धनवे व सागर नामदास यांनी नदीत उडी मारली. गणेश धनवे हे दरोडेखोर पळून जाऊ नये, यामुळे त्याच्या आधी पोहत नदीच्या पलिकडील तीरावर जाऊन थांबले, तर सागर नामदास यांनी दरोडेखोरावर लांब राहून लक्ष ठेवले. काही वेळानंतर दरोडेखोर अंकुश कचरे हा पोहून दमला. नंतर तो बाहेर आला. तेव्हा त्याला पकडण्यात आले. तोपर्यंत त्याचे दोन साथीदार पळाले होते. त्यांनाही काही तासांनी शोध घेऊन जेरबंद केले.

आरोपींकडे अधिक चौकशी करून गुन्ह्यात गेलेला ७० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच कोयते, तलवारी जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली पाटील, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, गणेश धनवे, सागर नामदास यांच्या पथकाने केली आहे.

करचे सराईत गुन्हेगार

अंकुश कचरे याच्यावर यापुर्वीचे तीन गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे. दोघांसोबत तीन अल्पवयीन साथीदार आहेत. त्यांनी यापूर्वीही आणखी काही गुन्हे केले आहेत का, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

रेकी करून दरोडा टाकला

कात्रजवरून खानापूरला जाऊन आरोपींनी दरोडा टाकला. त्यामुळे त्यांनी रेकी केल्याचा अंदाज होता. माहितीत आरोपींनी दोन ते तीन वेळा खानापूर येथे जाऊन वैष्णवी ज्वेलर्सची रेकी केली. मालक कधी घरी जातात, कामगार किती आहेत, याची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी भरदुपारी कोणी नसते, हे ठरवून दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT