

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१) होणारी गर्दी विचारात घेता तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
बंदोबस्तासाठी तब्बल पाच हजार असणार आहेत. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, क्यूआरटी, एसआरपीएफ, बीडीडीएस पथकांचा समावेश आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी मंगळवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी केली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा विजयस्तंभ अभिवादनसाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी केली असून, वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोजन केले आहे. बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकार्यांसह जवळपास पाच हजार कर्मचारी असणार आहेत. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका व एनडीआरएफ पथके सुसज्ज ठेवली आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी - ३३
पोलिस अधिकारी - ३३२
अंमलदार - ३ हजार १०
होमगार्ड - १ हजार ५००
एसआरपीएफ - ४ तुकड्या
बीडीडीएस पथके
क्यूआरटी पथके
कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या अनुयायांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंगचे नियोजन केले आहे. वक्फ बोर्ड पार्किंग २००, टोरंटो पार्किंग १६० आणि इनामदार पार्किंग इथे ४० मिनीबस बसतील असे नियोजन आहे. याशिवाय ठिकठिकाणी मोकळ्या जागेवर पार्क होणाऱ्या वाहनांच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी केले आहे.
गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची साध्या वेशात पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके चोरट्यांवर लक्ष ठेवणार आहेत.
कोरेगाव भीमा परिसरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त राहणार आहे. ड्रोन तसेच सीसीटीव्हींची यंत्रणा कार्यरत राहणार असून, नागरिकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण