

पुणे : कल्याणीनगर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश करत तरुणींची सुटका केली. याप्रकरणी स्पा सेंटर व्यवस्थापकासह दोघांना अटक केली.
मोतीबर समसुलहक रेहमान (वय ३१, रा. संजय पार्क, विमाननगर,मूळ रा. आसाम), अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई बालाजी सोगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागातील गेरा एस 77 इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी स्पा सेंटरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग, तसेच बाणेर भागातील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. त्यानंतर कोंढव्यातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी तरुणींची सुटका केली. याप्रकरणी स्पा सेंटरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकाराच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.