पुणे: गेल्या ७२ तासांपासून शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. मंगळवारी पावसाने किंचित जोर धरला. दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, चाकरमानी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. शहराच्या एकूण पावसात ३० मि.मी.ची भर पडली. त्यामुळे हंगामात एकूण ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात सर्वत्र चिखल झाला असून, वाहने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवा, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात शुक्रवार १७ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाचा जोर खूप कमी होता. शनिवार ते सोमवारपर्यंत दररोज १ ते ३ मि.मी. इतका कमी, पण भीज पाऊस झाला. मंगळवारी मात्र पावसाने किंचिंत गती वाढवली. पहाटेपासून पाऊस एकाच वेगाने सुरू झाला. अधूनमधून क्षणभर विश्रांती घेत तो सर्वत्र एकाच वेगाने पडत होता. त्यामुळे शहरात सरासरी १२ ते १६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
आज घाटमाथ्याला रेड अलर्ट
बुधवारी घाटमाथ्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. घाटमाथावार असाच पाऊस २७ जुलैपर्यंत राहणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञांनी केले आहे.
शहरात मंगळवारी झालेला पाऊस (मि.मी.)
शिवाजीनगर १२.९, चिंचवड १६, पाषाण १४.८, लोहगाव १४.८ एनडीए १४.५, कोरेगाव पार्क ८, हडपसर ७.७, आंबेगाव ११, कात्रज ११, खडकवासला १७.४, वारजे १५.२, डेक्कन १५.
गेल्या चोवीस तासांत ०.६४ टीएमसीची भर
घाटमाथ्यासह पानशेत मुठा खोऱ्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांतील पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत ०.६४ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत १८.३१ टीएमसी म्हणजेच ६२.८० टक्के पाणीसाठा झाला होता.
दिवसभरात टेमघर येथे सर्वांत अधिक ४६, तर पानशेत येथे २२, वरसगाव येथे २१ आणि खडकवासला येथे ९ मिलीमीटर पाऊस पडला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत १७.६७ टीएमसी (६०.६३ टक्के) पाणी होते.