Akshar Wari: संत तुकारामांचा भक्तिमार्ग : भक्ती आणि कर्माच्या संगमातून चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ संदेश

आषाढी वारीच्या निमित्ताने संत विचारांचे स्मरण; ‘मन करा रे प्रसन्न’ या संदेशातून निष्काम कर्म आणि मानवकल्याणाचा मार्ग
Akshar Wari
Akshar WariPudhari
Published on
Updated on

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर लाखो वारकरी पंढरपूरला पायी निघाले आहेत. रस्त्यात या वारकऱ्यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रती असणारा त्यांचा निष्काम भाव, मुखी नाम, ‌‘ज्ञानबा तुकाराम‌’चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणे देखील अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. पायी वारीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो. या सामान्य वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा व निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशी निमित्ताने आध्यात्मिक उत्सव सुरू झाला आहे.

भक्ती आणि कर्माची सांगड

तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषण केली. ‌‘सकळांसी येथे आहे अधिकार I कलियुगी उद्धार हरिच्या नामे॥‌’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही. तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो.

भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदऱ्यात किंवा देवळातच केली पाहिजे, असे आवश्यक नाही. कर्म करताना कोणत्याही स्थळी-काळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते, माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की कर्माच्या फळाची आशाही सुटते. फळाची चिंता मिटते.

मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रक्रिया असून, समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता. स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात,

‌‘मन करा रे प्रसन्न I सर्व सिद्धीचे कारण॥

- डॉ. एस. एन. पठाण, (लेखक माजी कुलगुरू व आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक-सल्लागार आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news