Potato Pudhari
पुणे

Pune Potato Price Crash: पुण्यात बटाट्याचे दर घसरले; प्रचंड आवक पण मागणी घटल्याने शेतकरी चिंतेत

मार्केट यार्डात दर 4 रुपयांवर; हॉटेल-रेस्टॉरंट क्षेत्रातील मागणी घटल्याचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: वडा-भजीच्या टपऱ्यांपासून ते फास्ट फूड काउंटरवरच्या फ्रेच फ्राईजपर्यंत सर्वांच्या आवडीचा असलेला बटाटा यंदा मात्र बाजारात उपेक्षित ठरत आहे. रोजच्या गरजेपासून ते हॉटेल-रेस्टॉरंटमधील लोकप्रिय पदार्थांपर्यंत सर्वत्र वापरला जाणाऱ्या बटाट्याची आज प्रचंड आवक झाली आहे.

मात्र, मागणीच नसल्याने बटाट्याचा दर तळाला पोहोचला आहे. मार्केट यार्डात बटाट्याचे दर 4 रुपये किलोपर्यंत खाली आले असून, दर्जेदार बटाट्याला 12 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये किलो दराने बटाट्याची विक्री सुरू आहे.

देशभरात उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी, आग््राा आणि इंदूरसह स्थानिक भागांतून मोठ्या प्रमाणात बटाटा गुलटेकडी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात दाखल होत आहे. सध्या दररोज 50 ट्रक बटाट्याची आवक होत आहे. साधारणपणे ही आवक 30 ते 40 ट्रकदरम्यान असते. मात्र, यंदा दररोज अतिरिक्त 10 ट्रक बटाटा बाजारात दाखल होत असल्याने पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनपुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला बसत आहे. गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने या क्षेत्रातील व्यवसाय मंदावला आहे. परिणामी, बटाट्याची मोठी खरेदी करणाऱ्या या क्षेत्रातून होणारी मागणी जवळपास निम्म्यावर आली आहे. बटाट्याचा हंगाम बहरात असताना मागणी घटल्याने बटाट्याचे दर नीचांकी पातळीवर घसरले असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारात मालाचा पुरवठा प्रचंड प्रमाणात होत असला, तरी त्याला अपेक्षित उठाव मिळत नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्र पुन्हा सुरळीत सुरू झाल्यास बटाट्याच्या मागणीत वाढ होऊन दर स्थिर होण्याची शक्यता आहे. अन्यथा, आवक कायम राहिल्यास दर आणखी घसरण्याची भीती आहे.
राजेंद्र कोरपे, बटाटा व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT