Bullet Silencer Seizure Pudhari
पुणे

Pune Police Operation Modification: पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’; कर्णकर्कश बुलेटवर कारवाई, १२३ सायलेन्सर जप्त

बेशिस्त वाहनचालकांसह मॉडिफाईड सायलेन्सर बसवणारे गॅरेजचालकही रडारवर; नाना पेठ, हडपसर, वाघोलीतील गॅरेजची यादी तयार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवसा, रात्री-अपरात्री मॉडिफाईड बुलेटद्वारे कर्णकर्कश आवाज, सायलेन्सरमधून फटाके, बेदरकार रॅली आणि धिंगाणा घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पुणे पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. केवळ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरच नव्हे, तर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार (बदल) करणाऱ्या गॅरेजचालकांवरही थेट कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाहनांचे नियमबाह्य 'मॉडिफिकेशन' होत असल्‍याने ऑपरेशन मॉडिफिकेशन पुणे पोलिसांच्‍या वतीने सुरू करण्यात आले आहे.

हे ऑपरेशन मॉडिफिकेशन रविवारी (दि. २) सुरू झाले असून, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १२३ बुलेटवर कारवाई करत या दुचाकींचे सायलेन्सर काढून जप्त केले आहे. शहरातील ३० पोलिस ठाण्यांच्‍या हद्दीत ही कारवाई केली आहे. शहरातील विविध भागांत काही बेशिस्त दुचाकीस्वार रात्रीच्या वेळी सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे असेे प्रकार सातत्याने वाढले आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस आणि वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम सुरू केली असून, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकतेनुसार वाहनेही जप्त केली जाणार आहेत. महत्त्वाच्या चौकांमध्ये संयुक्त तपासणी नाके उभारले असून, मॉडिफाईड सायलेन्सर, अनधिकृत हॉर्न, काळ्या काचा, वाहनांमध्ये केलेले नियमबाह्य बदल आणि इतर तांत्रिक फेरफारांची कसून तपासणी केली जात आहे. संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यासह त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

'त्या' गॅरेजचालकांची यादी तयार

वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून देणाऱ्या गॅरेजचालकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले आहे. दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, वाहनांचे नियमबाह्य मॉडिफिकेशन करणे तसेच मोटारींना काळ्या काचा बसवून देणाऱ्या गॅरेजची स्वतंत्र यादी तयार केली आहे. प्रामुख्याने नाना पेठ, स्वारगेट येथील वेगा सेंटर परिसरातील २५ ते ३० गॅरेज तसेच हडपसर, वाघोली परिसरातील काही गॅरेजचालक पोलिसांच्या रडारवर आले. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरात बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, बुलेटचा मोठा आवाज काढणारे नियमबाह्य सायलेन्सर लावणाऱ्या व्यक्तींवर आमचे लक्ष आहे. तसेच, असे मॉडिफाईड सायलेन्सर विकणारे दुकानदार आणि बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी आम्हाला याबाबत माहिती द्यावी, त्याचे फोटो वाहतूक पोलिसांच्या ॲपवर पाठवावेत. पोलिस तत्काळ कारवाई करतील.
संजय दराडे, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT