

पुणे: शहरात २० जुलैपासून पाऊस सुरूच असून, तो पुणेकरांचा पिच्छाच सोडेना अशी स्थिती झाली आहे. सोमवारी (३ ऑगस्ट) शहरात मध्यम पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने अजून दोन दिवस पाऊस राहील, असा अंदाज आहे. दरम्यान शहरात यंदाच्या मान्सून हंगामात तब्बल ६२० मि.मी. पाऊस झाला आहे.
शहरात जूनमध्ये अवघा ३६ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, जुलैची सुरुवात चांगली झाली. पावसाचा पहिला टप्पा १ ते ९ जुलै होता. या नऊ दिवसांत ३०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यानंतर दहा दिवस पाऊस गायब झाल्याने पुन्हा पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट घोंघावत होते. मात्र २० जुलैपासून शहरात पाऊस सुरू झाला तो अजून सुरुच आहे. तब्बल १३ दिवस शहरात पाऊस झाल्याने मान्सून हंगामात शहरात ६२० मि.मी.ची नोंद झाली आहे.
सोमवारी देखील जोरदार
शहरात गत १३ दिवसांत एकही दिवस पावसाने खंड दिलेला नाही. दररोज तो पुणेकरांना भिजवत आहे. घरून निघताना क्षणभर जरी रेनकोट, छत्रीचा विसर पडला तरी तो रस्त्यात ओलाचिंब केल्याशिवाय राहत नाही.
इतका पाऊस शहरात सुरू आहे. जुलैअखेर शहरात सरासरीच्या १८ टक्के अधिक पाऊस झाला. सोमवारी शहरातील बहुतांश भागात सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी सुरूच होत्या.