महेंद्र कांबळे
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीतील तुफान गर्दीवर जमिनीवरून पोलिसांची नजर होतीच; मात्र यंदा पुणे पोलिसांनी या नजरेला आकाशातील 'थर्ड आय'ची जोड दिली. पोलिसांनी वापरलेल्या एआय-बेस्ड गॉगलमुळे आकाशात उडणाऱ्या ड्रोनचे थेट दृश्य पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोरच उपलब्ध झाले. त्यामुळे समोरची मिरवणूक आणि गर्दीवर लक्ष ठेवतानाच वरून दिसणाऱ्या हालचालीही एकाच वेळी पाहता आल्या. ड्रोनचे दृश्य पाहण्यासाठी वारंवार मोबाईल हातात घेण्याची गरजच भासली नाही. या प्रकारचे दोन गॉगल ड्रोनशी संलग्न करण्यात आले होते.
विसर्जनासाठी शहरात १० पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात होते. सीसीटीव्ही, एआयच्या माध्यमातून व्हिडीओ विश्लेषण, महत्त्वाच्या ठिकाणी फेस रिकग्निशन कॅमेरे आणि ड्रोन असा तगडा बंदोबस्त ठेवला होता. या व्यवस्थेत गॉगलने आकाशातील ड्रोनचे चित्र थेट मैदानावरील अधिकाऱ्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचवले. गर्दीत बंदोबस्त करताना जवळची आणि दूरची परिस्थिती एकाच वेळी समजून घेणे महत्त्वाचे असते.
एखाद्या चौकात गर्दी वाढणे, मिरवणुकीचा प्रवाह बदलणे किंवा एखाद्या ठिकाणी अचानक लोकांचा ओघ वाढणे, हे ड्रोनमधून वरून अधिक स्पष्ट दिसत होते. गॉगलमुळे हे दृश्य अधिकाऱ्यांना तत्काळ पाहता आले. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधित पथकाला सूचना देणे यामुळे सोपे झाले.
ड्रोनचे लाइव्ह फीड पाहण्यासाठी मोबाईल काढणे, स्क्रीनकडे पाहणे आणि पुन्हा प्रत्यक्ष गर्दीकडे लक्ष देणे, हा वेळखाऊ प्रकार टळला. गॉगलच्या स्क्रीनवरच दृश्य उपलब्ध असल्याने हात मोकळे राहिले आणि प्रत्यक्ष बंदोबस्तावरील लक्ष कायम ठेवता आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस आयुक्त विवेक पवार यांनी या तंत्रज्ञाचा वापर उपयोगात आणला.
एआय-बेस्ड गॉगलचा असा झाला उपयोग
ड्रोनचे लाइव्ह दृश्य थेट गॉगलवर दिसल्याने मोबाईलमध्ये वारंवार पाहण्याची गरज टळली.
जमिनीवरील परिस्थिती पाहता आली.
गर्दी कोणत्या दिशेने वाढते आहे, याचा वरून तत्काळ अंदाज घेता आला.
मिरवणुकीचा प्रवाह बदलल्यास संबंधित पथकाला जलद सूचना देणे शक्य झाले.
चौक, मार्ग किंवा गर्दीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या लहान हालचालींवरही लक्ष ठेवता आले.
ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या गर्दीचे व्यापक चित्र एकाच वेळी मिळाले.
सीसीटीव्ही, ड्रोन आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या निरीक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली.
गॉगलचा मुख्य उपयोग ड्रोनचे दृश्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.
आकाशातील नजर थेट अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर आणणारा हा प्रयोग विसर्जन बंदोबस्तातील महत्त्वाचा तंत्रज्ञानाधारित बदल ठरला