Pune Hill Pudhari
पुणे

Pune BDP Reservation: पुणे आणि पीएमआरडीए हद्दीतील सर्व डोंगरांवर बीडीपी आरक्षणाची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा अहवाल

हिल टॉप-हिल स्लोप झोनचे जैवविविधता उद्यान आरक्षणात रूपांतर करण्याचा प्रस्ताव; डोंगरांच्या संरक्षणासाठी एकसमान धोरणाची गरज

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

पुणे: पुणे महापालिकेबरोबरच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील डोंगर व टेकड्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस उच्चस्तरीय समितीने केली आहे. सध्या डोंगर माथा डोंगर उतार क्षेत्राचे (हिल टॉप-हिल स्लोप झोन) म्हणून निश्चित असलेल्या क्षेत्रांचे जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणात रुपांतर करावे, अशी शिफारस या समितीकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे.

पुणे शहरातील डोंगरमाथा उतारावर हिल टॉप-हिल स्लोप झोन बरोबर बीडीपीचे आरक्षण आहे. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील डोंगरमाथा आणि डोंगर उतारावर हिल टॉप-हिल स्लोप झोन प्रस्तावित करण्यात आला आहे. याबाबत सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी राज्य शासनाने गतवर्षी माजी आयएएस अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली सहा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नेमली होती.

या समितीने नुकत्याच त्याचा अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात ही महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली. पुणे शहराच्या १९८७ च्या मंजूर विकास आराखड्यात हिल टॉप आणि हिल स्लोप क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या क्षेत्रात मर्यादित म्हणजेच ०.४ टक्के इतकीच बांधकामांना परवानगी होती. मात्र, जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याच्या पुनर्प्रकियेत प्रक्रियेत डोंगरमाथा व उतारावरील झोन व आरक्षणाचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

तर पीएमआरडीतील डोंगर माथा-उतारावर हा झोन प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या जमिनींसाठी सर्वसमावेशक आणि अंतिम धोरण निश्चित झालेले नाही. त्यामुळे या क्षेत्रांच्या नियमनाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे महापालिकेत १९९९ अंतिमता समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील डोंगरमाथा उतारावर बीडीपी आरक्षण टाकण्यात आले आहे.

जुन्या हद्दीतील आणि २३ गावांमधील डोंगर आणि उतार या दोन्ही क्षेत्रांचे भौगोलिक स्वरूप आणि पर्यावरणीय महत्त्व सारखे असताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणे योग्य नसल्याचे या उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले आहे. तसेच, महापालिका व पीएमआरडीए हद्दीतील सर्वच डोंगरमाथे व उतारावर बीडीपी आरक्षण टाकण्यात यावे, अशी शिफारस शासनाला पाठविलेल्या अहवालात केली असल्याची माहिती सूत्रांनी पुढारीशी बोलताना सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT