Canteen Pudhari
पुणे

Pune Theatre Canteen: पुण्यातील नाट्यगृहांना कॅन्टीनची सुविधा; कलाकार-रसिकांच्या संवादाला नवे व्यासपीठ

सहा नाट्यगृहांमध्ये लवकरच कॅन्टीन सुरू; बालगंधर्व रंगमंदिरातील कॅफेटेरियाही पुन्हा सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नाट्य प्रयोगासाठी कलाकारांची धावपळ अन्‌‍ नाट्यप्रयोगाचे सादरीकरण... अशावेळी प्रयोग संपल्यावर खऱ्या अर्थाने कलाकारांना गरज भासते ती विविध खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या कॅन्टीनची, तर नाटक पाहून झाल्यानंतर जवळच चहा, कॉफी वा नाष्ट्यासाठीचे हलकेफुलके पदार्थ मिळू शकले तर नाटकासह विविध विषयांवर गप्पा मारण्याची नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरते. त्याचबरोबर कॅन्टीनसारखी ठिकाणे कलाकार अन्‌‍ रसिक यांच्यातील संवादाचा दुवा ठरतात.

पण, महापालिकेच्या काही नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांमध्ये अद्यापही कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कलाकार, रसिकांची गैरसोय होत असे... त्यांची हीच अडचण समजून महापालिकेच्या सहा नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. नाट्यगृहांसाठी निविदा प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून, येत्या दीड महिन्यात पालिकेच्या सहा नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू होणार आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (पुणे-सातारा रस्ता), महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी), विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) आणि पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध) या नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू होणार आहे. त्याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर येथील ‌‘सांस्कृतिक कट्टा‌’ म्हणून ओळख असलेला कॅफेटेरियाही दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार असून, कलाकार आणि रसिकांच्या मागणीवरून नाट्यगृहामध्ये कॅन्टीन सुविधा सुरू होत आहे. कलाकारांच्या, रसिकांच्या सांस्कृतिक गप्पांचा, संवादाचा सांस्कृतिक कट्टाच जणू रंगणार आहे.

खाद्यपदार्थांच्या आस्वादांबरोबरच रंगणार गप्पांचे फड

पुण्यात महापालिकेची 16 नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्र आहेत. पण, प्रत्येक नाट्यगृहामध्ये कॅन्टीनची सुविधा नाही. त्यामुळेच सांस्कृतिक कार्यक्रम-नाट्यप्रयोगांचे मध्यंतर झाल्यावर रसिकांना नाट्यगृहाबाहेर जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा लागे. त्यामुळेच नाट्यगृहांमध्येही कॅन्टीन सुरू करण्यात यावे, ही मागणी सातत्याने कलाकार, रसिकांकडून होत होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पालिकेच्या नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या एक ते दीड महिन्यात सहा नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. चहा-कॉफी, वडापाव अन्‌‍ विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत रसिकांचे, कलाकारांचे गप्पांचे फड रंगणार आहेत.

पालिकेच्या काही नाट्यगृहांमध्ये कॅन्टीनची सुविधा नव्हती. त्यामुळे कलाकार, रसिकांकडून कॅन्टीन सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. त्यामुळे निविदा प्रक्रियेनंतर सहा नाट्यगृहांमध्ये कॅन्टीन सुरू होतील. तसेच काही कारणांमुळे बालगंधर्व रंगमंदिरातील कॅफेटेरिया 2017 मध्ये बंद झाला होता. त्यानंतर कोरोनाकाळातही कॅफेटेरिया बंद होता. तो सुरू करावा, अशी मागणी कलाकारांकडून, रसिकांकडून होत होती. त्यामुळे पालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडून त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे आणि आता हा कॅफेटेरिया पुन्हा करीत आहोत.
राजेश कामठे, पालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT