

पुणे: शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या तस्करांविरोधात प्रभावी कारवाईसाठी ‘ॲप’ आधारित प्रणाली तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांकडून दिलेली माहिती अतिशय गोपनीय राहणार आहे. प्रत्यक्षात ही माहिती कोठून आली हे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील समजणार नाही. त्यामुळे माहिती देणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
वाहतूक पोलिसांच्या ॲपवर नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे कारवाईसाठी जसे फोटो टाकू शकतात. तशाच प्रकारे या ॲपवर नागरिकांना जेथे अमली पदार्थाची विक्री होते त्याचे लोकेशन, फोटो, व्हिडीओ आणि टाकता येणार आहे. नागरिकांनी ही माहिती ॲपमध्ये टाकतचा ती थेट पोलिस आयुक्तालयात या ॲपचे नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. त्यानंतर तत्काळ पोलिस कारवाई करणार आहेत.
सहपोलिस आयुक्त रंजकुमार शर्मा यांनी सांगितले, पोलिसिंगमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांची मदत अमली पदार्थविरोधी मोहिमेत व्हावी या हेतूने हे ॲप तयार करण्यात आले आहे. अनेकदा माहिती देणाऱ्या नागरिकांना आपल्या गोपनीयतेबाबत शंका असते. तसेच अशा तस्करांची माहिती आपण जर पोलिसांना दिली, तर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या या लोकांकडून धोका निर्माण होईल असे वाटते. त्यामुळे नागरिक देखील उगीच भलती भानगड पाठीमागे नको म्हणून माहिती देणे टाळतात. मात्र, हे ॲप नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये माहितीचा दुआ म्हणून काम करणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर गुन्हे शाखा या ॲपचे नियंत्रण ठेवणार आहे.
पोलिस ठाणेस्तरावर अमली पदार्थविरोधी पथक
शहरात गुन्हे शाखेची दोन अमली पदार्थविरोधी पथके कार्यरत आहेत. मात्र, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता, आता पोलिस ठाणे स्तरावर देखील अमली पदार्थविरोधी पथक कार्यरत करण्याबाबत वरिष्ठ अधिकारी विचाराधीन आहेत. लवकरच ही पथके सुरू होणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगरसेवकांची पोलिस घेणार मदत
अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिस स्थानिक नगरसेवकांची मदत घेणार आहेत. नुकतीच परिमंडळ एक येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यावेळी नगसेवकांना पोलिस आयुक्तांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी मोहिमेला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.