

पुणे: शहरातील वाहतूक नियम मोडणारे फोटो पीटीपी ॲपद्वारे पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या प्रकल्पाची देशपातळीवर दखल घेतली गेली. त्या धर्तीवर आता बेकायदा होर्डिंगविरोधात आता थेट नागरिकांच्या मदतीने कारवाई होणार असून, अशा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ ॲपवर कळवावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. नियमांना हरताळ फासत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे.
जाहिरातीच्या नावाखाली होर्डिंग लावून शहर विद्रूप करत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर पहिल्यांदाच पोलिस आणि महापालिकेने मिळून पुणेकरांना पीटीपी ॲपचा वापर करून असे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंगविरोधात ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यात तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
महापालिका आणि शहर पोलिस यांनी गेल्या आठवड्यात ‘होर्डिंगमुक्त पुणे’ मोहिमेची संयुक्त घोषणा केली होती. त्याअंतर्गत पुढील सात दिवस शहरभर धडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, ‘पीटीपी’ ॲपद्वारे बेकायदा होर्डिंग, रस्त्यावरील बेवारस वाहने आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना ‘पीटीपी’ ॲप डाउनलोड करून त्याचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. ‘वाहतूक नियम तोडणारे, बेकायदा होर्डिंग लावणारे आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात माहिती द्या; आम्ही कडक कारवाई करू,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
शहरात विविध ठिकाणी पडून असलेल्या बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई
शहरात विविध ठिकाणी पडून असलेल्या बेवारस वाहनांवरही पीटीपी ॲपच्या माध्यमातून कारवाई केली जाणार असून, पुणेकरांना यासंबधी फोटो पाठविण्याचे अवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये पुणे पोलिस आणि पुणे महापालिका संयुक्तीकरीत्या कामगिरी बजावणार आहे. यासाठी पालिकेकडून बेवारस वाहने ठेवण्यासाठी शहरातील पंधरा ठिकाणे सुचवली आहेत, तर ही वाहने उचलण्यासाठी पंधरा टोइंग व्हॅनही उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच शहरातील अशा बेवारस वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पुणेकरांनी पीटीपी ॲपद्वारे माहिती देण्याचे आवाहनही केले आहे.
अडीच लाख तक्रारी; पावणेदोन लाख प्रकरणांत कारवाई
पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे 23 मार्च रोजी ‘पीटीपी’ ॲपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला. जानेवारीपासून आतापर्यंत 1 लाख 55 हजारांहून अधिक नागरिकांनी ॲपचा वापर केला आहे. त्यावरून सुमारे 2 लाख 49 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, पडताळणीनंतर 1 लाख 76 हजारांहून अधिक प्रकरणांत चलनाची कारवाई केली आहे. या उपक्रमांतर्गत फेबुवारी महिन्यातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाला 50 हजार, तर पुढील क्रमांकांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार, 10 हजार आणि 5 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘पीटीपी’ ॲपवरील तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलिस अंमलदारांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, तसेच उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव उपस्थित होते.