पुणे: पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना औषधे देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित पद्धतीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गंभीर आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये कफ सिरपसाठी रुग्णांना घरून बाटल्या आणायला लावणे आणि मलम कागदात गुंडाळून देणे, हा धक्कादायक प्रकार एफडीएच्या तपासणीत उघड झाला आहे. या अस्वच्छ आणि चुकीच्या पद्धतीमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट करीत एफडीएने महापालिकेला ही पद्धत तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
एफडीएच्या औषध विभागाने नुकतीच सहकारनगर येथील शिवशंकर पोटे दवाखाना आणि मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात अचानक तपासणी केली. या तपासणीत औषध वितरणाची ही धक्कादायक पद्धत समोर आली. केवळ दोनच दवाखाने नव्हे, तर महापालिकेचे ६० हून अधिक बाह्यरुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे आणि दोन रुग्णालयांमध्ये हीच पद्धत वर्षानुवर्षे सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रुग्ण घरून बाटल्या किंवा डब्या आणतात; मात्र त्या निर्जंतुक असतीलच, याची खात्री नसते. अशा असुरक्षित बाटल्यांमध्ये कफ सिरप भरून देणे किंवा मलम कागदात देणे, यामुळे औषधांचे दूषितीकरण होऊन रुग्णांचे गंभीर नुकसान होऊ शकते. हा प्रकार औषध नियमावलीविरोधात असल्याचे एफडीएने म्हटले आहे.
या प्रकारानंतर महापालिका आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. यापुढे औषधे पॅकबंद किंवा स्वच्छ बाटल्या व डब्यांमध्येच दिली जातील, याची खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. याबाबत गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध भांडारला कळविण्यात येणार आहे.डॉ. सुनील आंधळे, प्रभारी वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी
तपासणीत कोणतीही मुदतबाह्य औषधे आढळली नाहीत. वितरण पद्धती अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित होती. सध्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, एफडीएचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.गिरीश हुकरे, सह आयुक्त, अन्न व औषध विभाग