

जावेद मुलाणी
इंदापूर:
मन पांडुरंग। जीवन अभंग।
घडो संत संग। मजलागीं।
घातले रिंगण। सुख दुःख दोन।
चित्ती लागो ध्यान। पांडुरंगा।
डोईवर भार। झालासे आधार।
तुळस साकार। अंगणात।
डोहात काजळ। सापडेना तळ।
जीवन उजळ। व्हावे देवा।
माय चंद्रभागा। सगुणाचा धागा।
हृदयात जागा। शोधतसे।
युगे अठ्ठावीस। एक दिस।
लाभावा परीस। दर्शनाचा।
ही भावना मनात ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा मेळा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग ओळी नुसार श्रीक्षेत्र देहू पासून निघालेला वैष्णवांचा मेळा हरीचे नाम घेत आनंदाच्या डोहात बुडुन इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाल्यानंतर सोहळ्यातील मानाच्या दुसरे गोल रिंगण पार पडले ...
नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची रिंगण पाहणी आणि त्यांनंतर भगवे पताकाधारी झेंडेकरी, तुळशीवाल्या व हंडेकरी भगिनी, धावल्यानंतर,विणेकरी ,पखवाजवाले धावले. त्यानंतर पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी धावा केला . सुरुवातीला मानाच्या आणि अकलूज च्या मोहिते पाटील यांच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्हीही अश्वांच्या परिक्रमाने लक्ष लक्ष नयनांचे पारणे फेडले....
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रेश्वरांच्या इंदापूर नगरीत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी १८ जुलै रोजी बारा वाजता रयत शिक्षण संस्थेच्या कै. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.
या रिंगण सोहळ्यास
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आता माझी सरकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भरात शहा,भाजपाचे जेष्ठ नेते प्रदिप गारटकर , नीरा भीमा साखर कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील,सारिका भरणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता ठाकरे यांच्यासह आजी- माजी नगरसेवक शहरातील नागरीक आदीं उपस्थित होते.
इंदापूर नगरपरिषदेने याही वर्षी अंत्यत चांगल्या पद्धतीने शहरात भव्य स्वागत कमानी उभारुन तसेच वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता,रिंगण स्थळी सुशोभीकरण अशी सर्व जय्यत जोरदार तयारी केली होती.
भेटी लागे पंढरीनाथा!जीवा लागली तळमळ व्यथा!! कधी कृपा करसि नेणे! मज दिनाचे धावणे!! शिणले माझे मन! वाट पाहते लोचन !! तुका म्हणे भूक! तुझे पहावया मुख!!
शनिवारी सकाळी निमगांव केतकीत आरती झाल्यानंतर पालखी सोहळा निरोप देवून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. इरिगेशन बंगला , हेगडेवस्ती, सोनमाथ्यावरिल चढ नसल्याने आनंदात सोनाई दुध संघावर संघाच्या वतीने सोनाई परिवाराकडुन वैष्णवांचे स्वागत करून त्यांना मसालेदार दुध, फराळ आदी सेवा देण्यात आल्या. पालखी सोहळा पुढे झगडेवाडी, तरंगवाडी मार्गस्थ होवून पालखी गोखळीच्या ओढ्यात न्याहारीसाठी विसावली.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा येथील छोट्या गावकऱ्यांनी व नागरिकांनी फराळ नाश्टा देण्यात आला. सर्वांचे लक्ष लागले होते ते इंदापूरमधील एतिहासिक रिंगण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे .... !
पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी दिंडी करांनी रिंगण प्रदक्षिणेस सुरुवात केली. पालखी सोहळ्यातील नगारा प्रदक्षिणा झाली.
आणि त्यानंतर भगवे झेंडेकरी, तुळशी वृंदावन,हांडे तुळस यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर बेलवाडी नंतर इंदापूरातही पोलिसांनी आरोग्य विभाग महसुलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रदक्षिणा घातली. तसेच विणेकरी आणि पखवाजाचे हे पुंडलीका वरदे हरी विठ्ठल श्री न्यानदेव तुकाराम सह .... ज्ञानोबा तुकाराम.... ज्ञानोबा तुकाराम ...माऊली... माऊली ..असा जयघोष करीत त्यांनी रिंगणाला नव चैतन्य आणले.
मानाच्या दोन्हीही अश्विनी वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण केल्या. हे दृश्य हजारो उपस्थितांनी आपल्या नयनांनी अनुभवले . अश्वांच्या टापुची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी रिंगणाला लावलेल्या सरक्षंक काट्यांमधून धावा घेत एकच गर्दी केली. व अश्वाच्या टापुंच्या माती कपाळी लावल्यानंतर धन्य धन्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यानंतर मुख्य पालखीला टाळकरी वारकऱ्यांनी भजन करीत फुगडी , झिम्मा, खेळत मानवी मनोरे उभारत व शेवटी उडी घेऊन या अंत्यत प्रभावशाली एतिहासिक रिंगण सोहळ्याची सांगता झाली. वारकऱ्यांसह पोलिसांनी फुगडी खेळून या सोहळ्याचा आनंद साजरा केला.
या अत्यंत देखण्या शाही रिंगण सोहळ्यास कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा,बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार ,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, कोकणे,मुख्याधिकारी रमेश ढगे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रिंगण आटोपल्यानंतर पालखी सोहळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( आयटीआयच्या) प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात मुक्कामासाठी दाखल झाला इंदापूर शहरात ठिकठिकाणी अन्नदान भजन तसेच किर्तन आणि हरिपाठ सुरू असल्याने शहराला प्रति पंढरीची स्वरूप प्राप्त झाले होते.