

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमबीए/ एमएमएस प्रवेश नोंदणीच्या मुदतवाढीसह प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १९ जुलै २०२६ आहे. प्रवेशाची पहिली फेरी २८ जुलै २०२६ रोजी सुरू होणार असून, संपूर्ण प्रवेशप्रक्रिया १५ सप्टेंबर २०२६ रोजी संपणार आहे.
एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाची नोंदणी दिनांक २ ते १९ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमास आत्तापर्यंत ६५ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली ५९ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता एमबीए/ एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी' या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी.
कॅप प्रवेशाच्या एकूण ४ फेऱ्या होतील. यानंतर संस्थास्तरीय प्रवेश होतील. प्रवेशाच्या या सर्व प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत होणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट केले आहे.
... असे आहे वेळापत्रक
अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - २ ते १९ जुलै
प्रवेशासाठीच्या अर्जाची पडताळणी व अर्जाची निश्चिती - ३ ते २० जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २२ जुलै
विद्यार्थ्यांच्या तक्रारी (असल्यास) सादर करणे - २३ ते २५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २७ जुलै
कॅप फेरी १ साठी प्रवर्गनिहाय तात्पुरत्या जागांचे प्रदर्शन करणे (सीट मॅट्रिक्स) - २७ जुलै
कॅप फेरी-१ च्या विकल्प अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण आणि निश्चितीकरण- २८ ते ३० जुलै
कॅप फेरी-१ च्या तात्पुरत्या जागांचे वाटप - २ ऑगस्ट
कॅप फेरी १ मधील जागा वाटपानुसार जागा स्वीकारणे - ३ ते ५ ऑगस्ट
कॅप फेरी १ नंतर, नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - ३ ते ५ ऑगस्ट