NOC Pudhari
पुणे

Pune Municipal Election Preparation: पुणे महापालिका निवडणुकीचा बिगुल; उमेदवारांसाठी ऑनलाईन एनओसी, खर्चमर्यादा 15 लाख

पहिल्यांदाच 24 तासांत ना हरकत प्रमाणपत्र; मतदान, सीसीटीव्ही व ईव्हीएमबाबत महत्त्वाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पुढील महिन्यात 15 तारखेला या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना खर्चाची मर्यादा 15 लाख असून, या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरताना ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. हे पत्र देण्यासाठी यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रे व थकबाकी भरून 24 तासांच्या आत इच्छुकांना हे प्रमाणपत्र मिळवता येणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

पुण्यासह राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. यासंदर्भात पुणे महापलिकेच्या निवडणूक यंत्रणेने काय तयारी केली आहे, याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांना मंगळवारी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक अधिकारी व उपयुक्त प्रसाद काटकर, उपयुक्त रवी पवार उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, प्रचारफेऱ्या, सभा तसेच उमेदवारांच्या खर्चाबाबत व्हिडीओग््रााफी सर्व्हेलन्स पथक तयार करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना प्रलोभने किंवा प्रभाव पाडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेक पोस्ट पथक तयार करण्यात आले आहे. तर तक्रारींचे निवारण करण्यासाठी देखील महापालिकास्तरावर किंवा प्रभागनिहायस्तरावर आचारसंहिताभंगांच्या तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वच्छतागृह वापरण्याचे प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचा दाखला व इतर काही ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरजेची असते. ते लवकर मिळण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. वरील दाखले मिळवण्यासाठी अर्ज करताना आधार कार्ड, मतदार व प्रॉपर्टी नंबर https://nocelection.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांत ऑनलाइन पद्धतीने कुठल्या विभागाची थकबाकी नसल्याची पडताळणी करण्यात येईल. जर थकबाकी असेल तर उमेदवारला थकबाकी भरावी लागणार आहे.

मतदानवाढीसाठी करणार प्रयत्न

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदानवाढीसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येईल. गेल्या निवडणूकीत 55 टक्के मतदान झाले होते. यात वाढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आयुक्त राम म्हणाले.

संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्हीची नजर

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 4 हजार मतदान केंद्र उभारले जाणार आहेत. यातील किती केंद्र संवेनशील आहेत ? याबाबत पोलिस आयुक्त यांच्याशी बैठीक घेऊन त्यांच्याकडून यादी आल्यावर त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सीसीटीव्ही बसवण्यात येईल. साधारणत: 10 टक्के संवेनदशील मतदान केंद्र असू शकतात, असे आयुक्त राम यांनी सांगितले.

मतदानासाठी पुरेसे ईव्हीएम मशिन

महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशिन उपलब्ध आहेत. 13 हजार 200 बॅलेट युनिट, तर 4 हजार 400 कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएमची कमतरता पडणार नाही, असे आयुक्त म्हणाले.

कागदपत्रांसाठी एक खिडकी यंत्रणा

निवडणूकप्रक्रियेत अनेक कागदपत्रांची गरज असते. ही कागद पत्रे तातडीने मिळावी यासाठी एक खिडकी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कागदपत्रे मिळवताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र, सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी देण्यासाठी एकाच ठिकाणी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग राखीव सदस्यसंख्या 44 (पैकी महिलांसाठी राखीव - 22)

प्रारूप मतदार यादीवर प्राप्त एकूण हरकतींची संख्या : 65,213

मान्य हरकतींची संख्या : 47,063

अमान्य हरकतींची संख्या : 18,150

एकूण बदल झालेले मतदार : 92,466

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण मतदार 35,51,854

पुरुष :18,32,449

स्त्रिया: 17,19,017

इतर : 488

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT