

पुणे : अमेरिकेतील एक व्यक्ती जेफ्री एप्स्टीन यांची वादग्रस्त फाईल 19 डिसेंबर रोजी तेथील संसद खुल्या करणार आहे. यात तीन भारतीय आजी-माजी खासदारांचा समावेश असून, आपल्या देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. पंतप्रधानपदी महाराष्ट्रातील व्यक्तीची वर्णी लागू शकते, असा पुनरुच्चार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पुण्यात केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण यांनी निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील सरकार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जेफ्री एप्स्टीन ही एक वादग्रस्त व्यक्ती असून, कोवळ्या वयातील मुलींना फसवून राजकीय नेत्यांना पुरवत असे. त्याला शिक्षा झाली; पण त्याचा काही वर्षांपूर्वी जेलमध्ये गूढ मृत्यू झाला. मात्र अमेरिकेतील संसदेने ही फाईल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ती 19 डिसेंबर रोजी खुली होणार आहे, त्यामुळे या तारखेला महत्त्व आहे.
तीन भारतीय खासदारांचा समावेश
चव्हाण यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. या फाईलचा भारताशी काय संबंध, पंतप्रधान कसे बदलतील, यावर सावध भूमिका घेत कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, या फाईलमधील काही नावे पुढे आली आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स, इंग्लंडचा प्रिन्स अँड्य्रू यांची नावे आहेत. तसेच यात तीन भारतीय आजी-माजी खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे सरकार पक्षातील खासदार असले तर पतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल अन् भाजपमधील मराठी नेत्याची वर्णी तेथे लागेल. चव्हाण यांच्यावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती झाली. याला आधार काय? यावर ते म्हणाले, जरा इंटरनेटवर अमेरिकेत काय सुरू आहे पाहा. त्यावरून अंदाज येईल.