पुणे : भाजप- शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जागावाटपाच्या चर्चेत खुद्द शिवसेना शिंदे पक्षाच्या महानगरप्रमुखालाच आमंत्रण नाही, तर दुसरीकडे पक्षाचे विद्यमान नगरसेवक व इच्छुक दुसऱ्याच पक्षाबरोबर पॅनेल करण्याच्या तयारीत असल्याचा थेट आरोप काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाने मुलाखतीच्या वेळी केल्याने शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
भाजप-शिवसेना (शिंदे) आणि काँग््रेासमध्ये आज हे मानापमान नाट्य सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरूनही गदारोळ उठला आहे. राष्ट्रवादी एकत्र आली तर एका पक्षाच्या प्रमुखाने राजीनाम्याची भाषा सुरू केली, तर दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी युती झाल्यास राष्ट्रवादीला सत्तेत वाटा न देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्नावरूनही उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती आज सुरू झाल्या असून, काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सायंकाळी संपल्या. तर भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जागावाटपाबाबतची चर्चा आज चांगलीच लांबली. शिवसेना (शिंदे) पक्षाचा सध्या एक नगरसेवक असून, त्यांनी 40 जागांवर दावा सांगितला होता. तरीही रात्री उशिरापर्यंत या वाटाघाटी पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. या वाटाघाटींपेक्षा या प्रक्रियेपासून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या महानगरप्रमुखालाच का लांब ठेवले, याबाबतच्या तर्कवितर्कांनाच अधिक उधाण आले आहे. भाजपच्या नेत्यांवर केलेल्या जहाल टीकेचाच हा परिणाम असावा, अशीही मते खुलेआम व्यक्त करण्यात येत आहेत.
काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी एका इच्छुक नगरसेवकाने विरोधी पक्षाशी छुपी युती केली असून, स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचे खटाटोप सुरू केला असल्याचा आरोप केला. हे इच्छुक अन्य विरोधकांच्या गोतावळ्यात वावरत असतात, अशीही तक्रार केली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या इच्छुकांवर कारवाई करणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर चौकशी करण्याचे आश्वासन श्रेष्ठींनी दिले.
काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीत आज प्रभाग 26 (घोरपडे पेठ-समता भूमी-गुरुवार पेठ) मधील इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे शेकडो समर्थकांसह झेंडे घेऊन काँग्रेस भवनवर आले. सात-आठ मिनिटे त्यांची मुलाखत चालली. त्यावेळी बाहेर घोषणाबाजी सुरू होती. नीलेश बोराटे, ऋषी बालगुडे, सीमा काची यांच्यासह एकूण 17 जण या प्रभागातून इच्छुक असून, मुलाखती झाल्या. बावधन, खडकवासला, नऱ्हे-आंबेगाव प्रभागात मात्र इच्छुकांची संख्या कमी होती.