NOC Pudhari
पुणे

Pune Municipal Election NOC: महापालिका निवडणूक अर्ज प्रक्रियेला सुरुवात; एनओसी मिळवताना उमेदवारांची कसरत

एक खिडकी व ऑनलाइन प्रणाली असूनही विलंब, तांत्रिक अडचणींमुळे इच्छुकांमध्ये असंतोष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, निवडणूक रणधुमाळीला अधिकृत सुरुवात होणार आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ‌‘ना-हरकत प्रमाणपत्र‌’ (एनओसी) मिळवताना इच्छुक उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे.

निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध विभागांकडील एनओसी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने ‌‘एक खिडकी योजना‌’ तसेच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्षात मात्र, या सुविधांचा लाभ उमेदवारांना अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार अनेक इच्छुकांनी केली आहे. एनओसीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित विभागांकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवारांचे खेटे वाढले आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या चालढकल कामामुळे प्रक्रिया रखडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एनओसी मिळेल की नाही, याबाबत उमेदवारांमध्ये संभम निर्माण झाला आहे.

याशिवाय, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी मिळवतानाही अडथळे येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. निवडणूक तयारीसाठी अत्यावश्यक असलेली मतदार यादी वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रचाराचे नियोजन आणि मतदारांशी संपर्क साधणे कठीण होत असल्याचे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे. महापालिकेने निवडणूकप्रक्रिया सुलभ करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात इच्छुक उमेदवारांना विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी ही प्रक्रिया अधिक किचकट ठरत असल्याची काही इच्छुकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

2100 अर्ज ऑनलाइन प्राप्त

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रथमच ऑनलाइन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. मागील निवडणूकी मध्ये भरपूर मनुष्यबळ लागत होते आणि ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत होता.

यामुळे विहित कालमर्यादेत ना-हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 2100 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिले ना-हरकत प्रमाणपत्र जैनुद्दीन हरून शेख यांना सर्वप्रथम ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व खात्यांची पडताळणी करून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT