पुणे: सोळा निकषांच्या आधारे, अत्याधुनिक यंत्रणा वापरून हवामान शास्त्रज्ञांनी जूनमध्ये खंड पडेल आणि जुलैमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या वर्षी तयार झालेल्या पंचांगांनी हेच भाकित अचूकपणे तयार केले आहे.
भारतीय पंचांगात यंदा राज्यात २० जूनपर्यंत कमी पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. मात्र, २२ जून ते ४ नोव्हेंबरपर्यंत चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले आहेत. यंदा पावसाचे दिवस कमी, खंड जास्त, असे स्वरूप राहील. सर्वच नक्षत्रांत पुरेसा पाऊस पडेल, असा दावा पंचांगकर्त्यांनी केला आहे.
राज्यातील सर्वच प्रमुख पंचांगांत त्या त्या वर्षीचा नक्षत्रनिहाय पर्जन्यविचार दिलेला असतो. तसाच सर्वच पंचांगांत यंदा दिलेला आहे. चंद्राच्या कक्षा भ्रमणाचा काल घटका, पळे आणि तिथी याप्रमाणे सुमारे ८०० कलांचे गणित करून हे अंदाज दिले जातात. एकूण २७ नक्षत्रे आहेत. त्यातील पर्जन्याची नक्षत्रे निवडून त्यांचे अंदाज मांडण्यात आले आहेत.
...हे पाहा अतिवृष्टीचे अंदाज
६ जुलै ते १९ जुलै : मुसळधार (धरणे भरतील)
२४ जुलै ते १ ऑगस्ट : मुसळधार (काही ठिकाणी अतिवृष्टी.)
२५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट : मुसळधार (मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि उत्तर भारतात पूरस्थिती संभवते.)
१३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर : (विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल.)
२४ ते ३१ ऑक्टोबर आणि १ ते ४ नोव्हेंबर (काही भागांत अतिवृष्टीची शक्यता.)
मृग नक्षत्र : (७ जून ते २१ जून), कमी पाऊस. दि. ८, ९, १४ या तारखेला पाऊस पडेल. मात्र, तुरळक ठिकाणी.
आर्द्रा नक्षत्र : २२ जून ते ५ जुलै, पाऊस दि. २२, २३, २५, २६, २९ जून रोजी मध्यम पाऊस पडेल.
पुनर्वसु : ६ जुलै ते १९ जुलै, पाऊस दि. ६, ७, १३, १४, १५, १८, १९ (या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता, पाणीपातळी वाढून धरणे भरतील.)
पुष्य : २० जुलै ते २ ऑगस्ट, पाऊस दि. २४, २५, २९, ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट. (या नक्षत्रात सर्वत्र चांगला पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल.)
आश्लेषा : ३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट, पाऊस दि. ३, ४, १०, १५ (कमी; पण समाधानकारक पाऊस.)
मघा : (१७ ते २९ ऑगस्ट) पाऊस दि. २५, २६, २७, २८, २९ (पूर्वार्धात मोठा खंड पडेल. मात्र, उत्तरार्धात मोठा पाऊस. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि उत्तर भारतात पूरस्थिती संभवते.)
पूर्वा : (३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर), पाऊस दि. ४, ५, ६, ९ सप्टेंबर मध्यम पाऊस (दक्षिण महाराष्ट्रातच जोर) उर्वरित भागांत कमी पाऊस.
उत्तरा नक्षत्र : (१३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर), पाऊस दि. १९, २०, २१,२२, २३, २४ सप्टेंबर (या नक्षत्रात उष्णतामान वाढेल आणि पाऊसही भरपूर पडेल. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल.)
हस्त नक्षत्र : (२७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर), पाऊस दि. २७, २८, २९ सप्टेंबर आणि ४, ५, ६, ७ ऑक्टोबर (खंडित स्वरूपाचा पाऊस; पण मोठ्या सरी पडतील.)
चित्रा : (१० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर), पाऊस दि. १०, ११, १९, २२ (मध्यम पाऊस पडेल.)
स्वाती : (२४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर), पाऊस दि.२४, २५, ३१ ऑक्टोबर आणि १, २, ३, ४ नोव्हेंबर (काही भागांत अतिवृष्टीची शक्यता.)
काय म्हणाले मोहन दाते (दाते पंचांग, सोलापूर)
घटका आणि पळे हे आता जुने झाले, आता नक्षत्रांतील सूर्य-चद्रांची स्थिती आणि वेळ, यानुसार वैदिक गणित मांडून हे भाकीत केले जाते. आम्ही सुमारे वर्षभरआधी हे भाकीत देतो. हवामान विभागाप्रामाणे आमच्याकडे अद्ययावत रडार यंत्रणा नाही. आमच्या शास्त्रात अल निनो हा प्रकार येत नाही. ग्रहांच्या स्थितीचा अंदाज मांडला जातो. तोही वर्षभर आधी, तर हवामान विभाग चार दिवस अलिकडे-पलिकडचे अंदाज देतो. सूर्य-चंद्र कोणत्या नक्षत्रात कुठे आहे, त्या वेळची कुंडली तयार केली जाते. यात संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज असतो. तो प्रत्येक गावाला लागू होईल, हे सांगता येत नाही. अक्षांश आणि रेखांश, यावरून हे अंदाज काढले जातात. ग्रहांची स्थिती-युती याचे संदर्भ, काही प्राचीन संदर्भग्रंथ, याचा विचार केला जातो.