पुणे : स्वारगेट ते पीसीएमसी तसेच वनाज ते रामवाडी हे दोन मार्ग सुरू आहेत. त्यामध्ये आता हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाची भर पडणार आहे. तसेच खराडी ते खडकवासला मार्ग सुरू होणार आहे. या सगळ्या मार्गांवरून थेट पुणे विमानतळावर जाता यावे यासाठी खराडी ते पुणे विमानतळ असा मार्ग तयार करण्यासाठी एक डीपीआर तयार करायला सांगितला आहे. त्यावर पुणे महापालिका आणि महामेट्रो काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आल्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 - खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो,
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे लवकरच उद्घाटन होणार आहे. यामध्ये आता या दोन नवीन 31.6 किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांचा समावेश होणार आहे. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी 31.60 किलोमीटर असून, त्यावर एकूण 28 स्थानके असतील. यासाठी 9857 कोटी 85 लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील मोहोळ यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदार असतील चुकीच्या मतदार यादीतील अनेक गोष्टी असतील. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी भूमिका मांडणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजे. फक्त याचे राजकारण करण्याची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. प्रत्येकवेळी हीच स्थिती होती. मतदार याद्या योग्य असाव्यात, यासाठी आमचा पक्षदेखील आग्रही आहे;
परंतु यामध्ये राजकारण करण्यात येऊ नये. कारण राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडले तेच घडणार आहे. विरोधकांनी मतचोरी, मतदारयाद्यांचे घोळ हे दाखवण्याच्या प्रयत्न केला. परंतु बिहारच्या जनतेने त्यांना धडा शिकवला. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असे देखील मोहोळ यांनी स्पष्ट केले.