Mallakhamb Pudhari
पुणे

Pune Mallakhamb Controversy: पुणे महापौर चषक मल्लखांब स्पर्धेवरून वाद चिघळला

जिल्हा संघटनेचा आक्षेप; अनधिकृत संघटनेला परवानगी दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‌‘पुणे महापौर चषक मल्लखांब स्पर्धे‌’च्या आयोजनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनावर गंभीर आक्षेप घेत क्रीडा उपआयुक्तांना जाब विचारला आहे.

यासंदर्भात पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरे, सचिव शकील तांबोळी, उपाध्यक्ष स्वाती सातपुते, सदस्य समीर शिंदे आणि तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अरणकल्ले उपस्थित होते.

खरे म्हणाले, ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी महापालिकेने कोणत्या अधिकारात दुसऱ्या अनधिकृत संघटनेला परवानगी दिली? नियमानुसार या स्पर्धेसाठी जिल्हा मल्लखांब संघटनेने आधीच बजेट आणि नियोजनाची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी क्रीडा विभागाने परस्पर निर्णय बदलला आहे. पुण्यातील सुमारे 300 ते 400 खेळाडू आणि 14 संस्था या स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहिल्या आहेत.

तसेच, धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार विद्यमान कार्यकारिणी कायदेशीर असतानाही क्रीडा विभागाने डावलले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच स्पर्धेचा निधी अधिकृत बँक खात्यातच जमा करावा, अन्यथा होणाऱ्या गैरव्यवहाराला प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा दिला असून, क्रीडामंत्री आणि क्रीडा आयुक्तांनाही निवेदन देण्यात आल्याचे तांबोळी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला यासंदर्भात विचारणा केली होती. त्यांच्याकडून सत्यजित शिंदे यांची संघटना अधिकृत असल्याचे कळवल्याने त्या संघटनेमार्फत स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT