पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये एकूण 867 मतदारांचा समावेश केला आहे. या मतदारांमध्ये 441 पुरुष आणि 426 महिला मतदार आहेत. निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या हालचालींना अधिक गती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होणार असल्याने राजकीय पक्षांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुकीसाठी जिल्ह्यात 11 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड, मंचर, राजगुरुनगर, शिरूर, दौंड, बारामती, सासवड, भोर, वडगाव मावळ आणि हडपसर येथे ही केंद्रे असतील. मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारांना या केंद्रांवर मतदान करता येणार आहे.
या मतदारसंघातील मतदारांमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांतील पात्र सदस्यांचा समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधीच मतदार असतात.
अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूक विभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध केली आहे.
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची ही निवडणूक आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.