

लोणी काळभोर: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारू प्राशनामुळे अनेक निष्पाप व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि विविध राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचे चित्र आहे. एका बाजूला धाडसत्रे, कारवाया आणि गुन्हे दाखल करण्याची लगबग सुरू असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते पोलिस ठाण्यांवर मोर्चे, ठिय्या आंदोलने आणि अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
मात्र, या सर्व घडामोडींमुळे नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत असून, लोकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि राजकीय यंत्रणा जागी का होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अवैध दारू, मटका, अमली पदार्थ, गांजा तसेच बनावट देशी-विदेशी दारूचे अड्डे अनेक वर्षांपासून सुरू असताना त्यांच्यावर वेळेत कठोर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागरिकांच्या मते, स्थानिक प्रशासनाचे अपयश आणि राजकीय संरक्षणाशिवाय असे बेकायदा व्यवसाय दीर्घकाळ सुरू राहू शकत नाहीत. त्यामुळे मृत्यूनंतर सुरू झालेल्या धाडसत्रे, कारवाया आणि आंदोलनांकडे संशयाने पाहिले जात आहे. काही ठिकाणी लोकप्रतिनिधी स्वतः अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकताना दिसत असले, तरी हीच तत्परता यापूर्वी का दाखवली गेली नाही? अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक आणि विषारी पदार्थांचा वापर करून दारू तयार करणे, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. अशा धंद्यांवर सातत्याने नियंत्रण ठेवणे आणि जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कारवायांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक गाव, वस्ती आणि परिसराची माहिती लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला असते. त्यामुळे अवैध धंद्यांची माहिती नव्हती, हा दावा जनतेला मान्य नाही. उलट या धंद्यांमागील आर्थिक हितसंबंध, कथित हफ्तावसुली आणि राजकीय संरक्षण यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
घटनेनंतर यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली असली आणि अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र असले तरी ही तत्परता आधी दाखवली असती तर अनेक निष्पाप जीव वाचले असते, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जनतेची अपेक्षा आता केवळ सहानुभूतीची नसून कायमस्वरूपी आणि परिणामकारक कारवाईची आहे. विषारी दारूकांडासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अवैध दारू, अमली पदार्थ, मटका आणि इतर बेकायदा धंद्यांविरोधात सातत्यपूर्ण, निष्पक्ष आणि कठोर मोहीम राबविण्याची गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.