Labour Unemployment Pudhari
पुणे

Pune Labour Chowks: महागाई वाढली; रोजगार घटला! कोंढवा-वानेवडीतील कामगार कट्टे ओस पडले, ‘गड्या आपला गावच बरा’

रोजंदारीच्या कामाची अनिश्चितता अन् वाढत्या खर्चाचा दुहेरी फटका; बांधकाम क्षेत्रातील स्थलांतरित कामगारांचा गावाकडे परतीचा मार्ग

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

कोंढवा: बांधकाम, रंगकाम, प्लंबिंग, सेंट्रिंग, गवंडी, मजुरी तसेच विविध स्वरूपाची रोजंदारीची कामे मिळविण्यासाठी सकाळच्या वेळी गजबजणारे कामगार कट्टे आता हळूहळू ओस पडू लागले आहेत. कोंढवा, वानवडी, महंमदवाडी परिसरातील विविध कामगार कट्ट्यांवर काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत दिसत होते. मात्र, सध्या या कट्ट्यांवर कामगारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनंदिन जीवनातील वाढती महागाई, घरभाडे, अन्नधान्य, प्रवासाचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर वाढत्या खर्चाच्या तुलनेत रोजंदारीच्या कामातून मिळणारे उत्पन्न पुरेसे ठरत नसल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, शहरात उपलब्ध होणाऱ्या कामाच्या संधींमध्येही सातत्य राहिलेले नाही. त्यामुळे रोज काम मिळेलच, याची शाश्वती नसल्याने अनेक कामगारांनी शहर सोडून पुन्हा आपल्या मूळ गावाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पुणे शहरात रोजगाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कामगार दाखल होतात. मात्र, शहरातील वाढता खर्च आणि अनिश्चित रोजगार, यामुळे मिळणाऱ्या मजुरीतील मोठा हिस्सा निवास, जेवण आणि प्रवासावर खर्च होतो. महिन्याच्या अखेरीस हातात फारशी बचत राहत नसल्याने काही कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्यास प्राधान्य दिले आहे.

'शहरात काम मिळाले तरच उत्पन्न, नाहीतर त्या दिवसाचा खर्चही भागत नाही,' अशी भावना अनेक कामगार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गावाकडे शेती, बांधकाम किंवा इतर उपलब्ध कामे करून कमी खर्चात जीवन जगणे अधिक सोयीचे वाटत असल्याचे कामगार सांगतात. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी महागाईचा फटका अधिक तीव्र आहे. घरभाडे, किराणा, स्वयंपाकाचा गॅस, प्रवास, औषधे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र त्याच प्रमाणात वाढत नसल्याची तक्रार कामगारांकडून केली जात आहे.

एक दिवस काम मिळाले नाही, तर त्या दिवसाचे उत्पन्न थेट कमी होते. त्यामुळे अनियमित रोजगार आणि वाढता खर्च, या दुहेरी संकटाचा सामना कामगारांना करावा लागत आहे. पुणे शहराच्या वाढीत स्थलांतरित कामगारांचा मोठा वाटा आहे. बांधकामांपासून घरगुती कामांपर्यंत अनेक क्षेत्रे या कामगारांच्या श्रमावर अवलंबून आहेत. मात्र, रोजगाराची अनिश्चितता वाढल्यास या कामगारांचा शहरातील मुक्काम कमी होण्याची शक्यता आहे.

'शहरात राहून खर्च भागत नसेल तर गावाकडे परतणेच योग्य,' असा विचार अनेक कामगार करू लागले आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गजबजणारे कामगार कट्टे आता हळूहळू रिकामे होत असल्याचे स्थानिक पातळीवरील चित्र आहे. एकीकडे, शहराचा विस्तार वेगाने होत असताना दुसरीकडे त्या शहराच्या विकासात हातभार लावणारा कामगारवर्ग मात्र रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे गावाकडे परतत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे 'महागाई वाढली; पण रोजगार वाढेना; म्हणून गड्या आपला गावच बरा' अशी भावना कोंढवा, वानवडी आणि महंमदवाडी परिसरातील कामगार कट्ट्यांवर प्रकर्षाने जाणवत आहे.

रोजगाराच्या स्थैर्याची गरज

कामगार कट्ट्यांवरील घटती गर्दी ही केवळ कामगारांची संख्या कमी झाल्याची बाब नसून, वाढती महागाई आणि अस्थिर रोजगार, यांचे प्रतिबिंब असल्याचे जाणकारांचे मत आहे. रोजंदारी कामगारांना नियमित रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि परवडणाऱ्या निवासाची सुविधा उपलब्ध झाल्यास शहरात काम करण्याची त्यांची तयारी वाढू शकते.

बांधकाम क्षेत्रातील बदलांचाही परिणाम

कोंढवा, वानवडी आणि महंमदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असली, तरी प्रत्येक कामगाराला सातत्याने काम मिळतेच, असे नाही. बांधकामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या कौशल्याच्या कामगारांची गरज असते. परिणामी, काही दिवस काम मिळते, तर काही दिवस कामाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. कौशल्य असलेल्या कामगारांना तुलनेने मागणी असली, तरी अकुशल कामगारांसमोर रोजगाराचे मोठे आव्हान असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामगार कट्ट्यावर येणाऱ्या मजुरांच्या संख्येवरही त्याचा परिणाम झाला आहे.

पूर्वी गर्दी; आता मोजकेच कामगार

कोंढवा, वानवडी आणि महंमदवाडी परिसरातील कामगार कट्ट्यांवर पूर्वी पहाटेपासूनच कामगारांची गर्दी होत असे. ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक किंवा घरमालक कामगारांच्या शोधात या ठिकाणी येत असत. गवंडी, बिगारी, सुतार, पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि इतर कौशल्याधारित कामगार सहज उपलब्ध होत असत. मात्र, सध्या या ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत कमी कामगार दिसून येत आहेत. काही कामगारांना नियमित स्वरूपाची कामे मिळत असल्याने ते थेट संबंधित ठिकाणी जातात, तर अनेकांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामगार कट्ट्यांवरील गर्दी कमी झाल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT